बीड : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत बीड जिल्ह्याने उत्कृष्ट काम करून नुकताच अव्वल क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ आता कुटूंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यातही बीड जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. अहमदनगर दुसऱ्या तर भंडारा तिसऱ्या स्थानी आहे. आठवड्यात बीड आरोग्य विभागाचे हे दुसरे मोठे यश आहे. त्यामुळे प्रतिमा उंचावण्यास मदत होत आहे.
बीड जिल्ह्याचा आरोग्य विभाग मागील काही दिवसांपासून विविध कामांत आघाडीवर आहे. कायाकल्पमध्ये केज उपजिल्हा रूग्णालयापाठोपाठ धानोरा ग्रामीण रूग्णालयाने १० लाख रूपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकावले. त्यानंतर प्रसुतीनंतर तांबी बसविण्यातही बीड मागे नाही. तीन वर्षांत तब्बल १४ हजार ४४१ महिलांना तांबी बसविण्यात आली आहे. यामध्ये बीड राज्यात अव्वल आहे. एकापाठोपाठ एक यश मिळत असतानाच आता कुटूंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यातही बीड आरोग्य विभाग पहिल्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालयातही या शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शस्त्रक्रियांचा आकडावा वाढत चालला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार व त्यांची टिम यासाठी परीश्रम घेत आहेत.
१६ हजार महिलांचे झाले सिझरजिल्ह्यात सरकारी आरोग्य संस्थामध्ये प्रसुतीचा आकडाही झपाट्याने वाढला आहे. तसेच आठ ठिकाणी सिझरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तीन वर्षांत तब्बल १६ हजार २०४ महिलांचे सिझर झाले आहे. यातही बीड राज्यात अव्वल असल्याचे सांगण्यात आले. तीन वर्षातील नॉर्मल प्रसुतीची संख्या ८२ हजार ७४ एवढी माठी आहे.
खाजगी डॉक्टरांचे ‘मातृत्व’ लाभदायकप्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला खाजगी स्त्री रोग तज्ज्ञ मोफत उपचार करतात. बीडमध्ये ८ हजार ३१४ डॉक्टरांनी आतापर्यंंत मोफत सेवा दिली आहे. तर ५ हजार १९५ महिलांची मोफत सोनोग्राफी करण्यात आली आहे. यातही बीडच टॉपवर आहे.
आरोग्य सेवा तत्पर देण्यास आम्ही प्रयत्नशिल आहोत. कुटूंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात आतापर्यंत बीड अव्वल आहे. तसेच सिझरचे प्रमाणही वाढले आहे. खाजगी रूग्णालयांपेक्षा सरकारी रूग्णालयांत जास्त प्रसुती आणि कुटूंबकल्याणच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. माझ्यासह लोकसहभागातूनही ७९ लाख रूपये जमा करून विविध साहित्य व वस्तू मिळाल्याने अनेक अडचणी कमी झाल्या. - डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड