बीड : जिल्ह्याला तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी नद्या, ओढ्यांना पूर आल्याने अनेक रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. धरणेही ओव्हरफ्लो झाली आहेत. जिल्ह्यातील पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी रात्रीपासून व मंगळवारी दिवसभर संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. गोदावरी, सिंदफना, बिंदूसरा, सरस्वती, वाण, लेंडी, सीना, मांजरासह जवळपास सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जवळपास सर्वच धरणे भरले आहेत. गोदावरीला आलेल्या पुरामुळे गेवराई तालुक्यातील नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. गेवराई तालुक्यातील राजापूरचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. फुलसांगवी तलाव पहिल्यांदाच १०० टक्के भरला आहे. केज तालुक्यातील काचरवाडी तलावाच्या सांडव्याला झाड अडकल्याने तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. हे झाड ग्रामस्थांच्या मदतीने काढल्याने धोका टळला आहे. शिरूरकासार तालुक्यात सिंदफना नदीतील पाणीप्रवाह कमी झालेला नाही. आष्टी, पाटोदा तालुक्यांतही संततधार सुरू आहे. माजलगाव, अंबाजोगाई, वडवणी तालुके जलमय झाले आहेत. परळी-अंबाजोगाई मार्गावर नदीला पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. मंगळवारी दिवसभरात कोठेही जीवितहानीची घटना घडली नाही.
बीड जिल्ह्याला तिसऱ्या दिवशीही झोडपले, जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:40 AM