बीड : दुचाकीवरून ड्रमने पाणी आणताना दुचाकी घसरली. याचवेळी पाण्याने भरलेला ड्रम अंगावर पडला. यामध्ये २८ वर्षीय महिला जागीच ठार झाली. ही घटना शनिवारी सकाळी बीड तालुक्यातील गुंजाळा येथे घडली. बीड जिल्ह्यातील हा चौथा पाणीबळी ठरला आहे.
मिनाक्षी अनुरथ घुगे (२८ रा.गुंजाळा ता.बीड) असे मयत महिलेचे नाव आहे. बीड जिल्ह्यात सध्या सर्वत्र तीव्र पाणी टंचाई आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरकि धावाधाव करीत आहेत. गुंजाळा येथे पाणी टंचाई आहे. मिनाक्षी व अनुरथ हे दोघे दुचाकीवर ड्रम ठेवून पाणी आणत होते. शनिवारी सकाळीही ते पाणी आणण्यासाठी गेले. शेतातील बोअरमधून पाणी भरून ते दुचाकीवरून गावी परतले. याचवेळी रस्त्यात त्यांची दुचाकी घसरली. यामध्ये ड्रम त्यांच्या अंगावर पडला. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. तसेच पती अनुरथही गंभीर जखमी झाले. दोघांनाही तात्काळ जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. मात्र रस्त्यातच मिनाक्षी यांचा मृत्यू झाला. तर पती अनुरथवर एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा रूग्णालय पोलीस चौकीत या प्रकरणाची नोंद झाली आहे.
दरम्यान, पाणीबळीची ही चौथी घटना असून यापूर्वी गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे आडातून पाणी भरताना आडात पडून वृद्धेचा, वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे पाण्याचे ड्रम असलेली बैलगाडी अंगावर पडल्याने दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाला होता.