बीड : जिल्हा रुग्णालयात कर्तव्य बजावणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थिनीची येथीलच एका कर्मचाऱ्याने छेड काढली होती. प्राथमिक चौकशीत हा कर्मचारी दोषी आढळल्याने त्याची माजलगाव ग्रामीण रुग्णालयात बदली करून तात्पुरती कारवाई केली आहे. पुढील कारवाईसाठी आरोग्य उपसंचालक यांच्याकडे बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रस्ताव पाठविला आहे. या प्रकरणावरून शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात गोंधळ होऊन हाणामारी झाली होती.
बीड जिल्हा रुग्णालयाची जूनी इमारत कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी राखीव ठेवली आहे. त्यामुळे ओपीडी, आयपीडी व अपघात विभाग शहराजवळील आदित्य महाविद्यालयात हलविण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीची रुग्णालयातीलच एका कर्मचाऱ्याने छेड काढली होती. याची रितसर तक्रार केल्यानंतर चौकशी समिती नियूक्त केली. या समितीने शनिवारी अहवाल दिला. यात तो प्रथमदर्शनी दोषी आढळल्यानेच त्याची माजलगावला बदली केली आहे. पुढील कारवाईसाठी आरोग्य उपसंचालक लातूर यांच्याकडे चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, शुक्रवारी छेड काढणार कर्मचारी व मुलीच्या नातेवाईकांमध्ये हाणामारी झाली होती. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. शासकीय इमारतील गोंधळ घालून नुकसान केल्याबद्दल रुग्णालय प्रशासनाकडून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावर काय कारवाई झाली हे विचारण्यासाठी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना संपर्क केला. परंतु त्यांनी फोन न घेतल्याने त्यांची बाजू समजली नाही. त्यामुळे कारवाईबाबतही समजले नाही.
ज्या कर्मचाऱ्याविरोधात तक्रार आली होती, त्याची चौकशी केली. याचा अहवाल समितीने देताच त्याची माजलगाव ग्रामीण रुग्णालयात बदली केली आहे. पुढील कारवाईसाठी उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड