बीड: एका शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री करण्याच्या मागणीचं राज्यपालांना पत्र लिहिल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे शिवसेना-भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरूनच रस्सीखेच सुरू असताना शेतकरी पुत्रानं ही मागणी केल्यानं सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय ठरत आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दहिफळ गावातल्या श्रीकांत विष्णू गदळे यांनी ही मागणी केली आहे.श्रीकांत हे मागील काही वर्षांपासून राजकारण आणि समाजकारण करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातल्या शिवसेना-भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत माझ्याकडे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार द्या, अशा आशयाचं पत्र लिहून त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतात पेरलेल्या सर्व पिकांचं नुकसान झालं आहे. शिवसेना-भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. हा तिढा सुटत नाही, तोपर्यंत राज्यातील जनतेच्या हितासाठी असा निर्णय घ्यावा, असं श्रीकांत यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा, शेतकरी पुत्रानं राज्यपालांना लिहिलेल्या पत्रानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 8:19 AM