बीड : आडातून पाणी शेंदताना अचानक पाय घसरून पडल्याने विमलबाई कान्होबा शिंदे (८९) या वृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे सोमवारी सायंकाळी घडली. बीड जिल्ह्यात पाणी टंचाईचा हा पहिला बळी ठरला आहे.
विमलबाईंचा मुलगा पुण्यात राहत असल्याने त्या गावी एकट्याच राहायच्या. सध्या सर्वत्रच पिण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चकलांबा येथेही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. सोमवारी दुपारी विमलबाई या पाणी आणण्यासाठी गावातीलच आडावर गेल्या. पाणी शेंदताना त्यांचा पाय घसरून तोल गेल्याने त्या आडात पडल्या. परिसरातील नागरिकांनी हे पाहिल्यावर त्यांना तात्काळ बाहेर काढून जिल्हा रूग्णालयात आणण्यात आली.
नाकातोंडात पाणी गेल्यामुळे प्रकृती चिंताजनक होती. सायंकाळच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी ही माहिती त्यांचा मुलगा बळीराम यांना दिली. त्यानंतर मंगळवारी जिल्हा रूग्णालय पोलीस चौकीत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेने बीड जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न समोर आला आहे. उन्हाळा अजून बराच दूर असताना फेब्रुवारीमध्येच जिल्ह्यात अनेक गावात टँकर सुरू झाले असून नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.