बीड : मुलगा - मुलगी लाडाचे असल्यामुळे १८ वर्षाच्या आतच त्यांच्या हाती दुचाकीची चावी दिली जाते. मात्र, शरीर व मनाने सुदृढ नसलेल्या या बालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळते. हे टाळण्यासाठी आता मुलाने नियम तोडल्यास पालकाला दंड केला जाणार आहे. सोमवारपासून यानिमित्त विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. तत्पूर्वी तीन दिवस जनजागृती केली जाणार आहे.
माझी मुलगा - मुलगी कॉलेजला जाते. आता ती मोठी झाली. त्यांना दुचाकीची अत्यंत गरज आहे. आणि मुलाच्या हट्टापायी पालक त्यांना हजारो रुपयांची नवी कोरी दुचाकी घेऊन देतात. त्यांना वाहतुकीच्या कसल्याही नियमांची कल्पना नसते. आपल्याला पोलीस पकडत नाहीत या गैरसमजूतीतून ते सुसाट वाहने पळवितात. गर्दी व अचानक समोरुन वाहने आल्यास त्यांना काय करावे हे समजत नाही. कारण शरीर व मनाने ते तितकेसे सुदृढ झालेले नसतात. अशा परिस्थितीत अपघात होण्याची दाट शक्यता असते.
अशी अनेक उदाहरणे आहेत. मात्र, आता हे टाळण्यासाठी वाहतूक शाखेने पुढाकार घेतला आहे. सोमवारपासून विशेष मोहीम हाती घेऊन १८ वर्षाखालील मुले वाहने चालविताना दिसल्यास त्यांना अडविले जाईल. त्यानंतर पालकांना बोलावून घेतले जाईल. मुलाला ५००, तर पालकाला कलम ४ (१) १८१ मो. वा. का. नुसार एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. विशेष म्हणजे परवाना नसताना वाहन चालविण्यास दिल्यावर मालकाकडून हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.
शाळा- महाविद्यालयात करणार जनजागृतीसध्या शाळा - महाविद्यालयांना सुटी आहे. ते सुरु झाल्यानंतर याबाबत जनजागृती केली जाणार आहे. सध्या क्लासेस व इतर सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीसाठी पुढाकार घेतला जाणार आहे. सोमवारपासून मात्र थेट कारवाईला सुरुवात केली जाणार आहे.
पालकाने जागृत रहावे मुलाने नियम तोडल्यास ५००, तर त्याच्या पालकाकडून एक हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल. सोमवारपासून मोहीम हाती घेणार आहोत. जनजागृतीबरोबरच कारवाया केल्या जातील. पालकांनीही याबाबत जागृत व्हावे. मानसिकता बदलून सहकार्य करावे. अपघात टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेत आहोत.- सुरेश बुधवंत, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा