- सोमनाथ खताळबीड : अवैध गर्भपात प्रकरणातील आतापर्यंतची मुख्य आरोपी असलेली मनीषा सानप ही अंगणवाडी सेविका कारागृहात आहे. गर्भपात करणारी सीमा डोंगरे हिने आत्महत्या केली, तर मुख्य आरोपी म्हणजे गर्भलिंग निदान करणारा फरार होता. त्याचा शोध घेण्यात बीड पोलिसांना यश आले असून, तो एक शिकाऊ डॉक्टर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तो मूळचा औरंगाबादेतील रहिवासी असून, त्याच्या अहमदनगरमधून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आता आरोपींची संख्या सात झाली आहे.
सतीश बाळू सोनवणे (रा. जाधववाडी, ता.जि. औरंगाबाद), असे या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. शीतल गाडे (वय ३०, रा. बकरवाडी, ता. बीड) या महिलेचा अवैध गर्भपातादरम्यान ५ जून रोजी मृत्यू झाला. या प्रकरणात पिंपळनेरचे उपनिरीक्षक एम.एन. ढाकणे यांच्या फिर्यादीवरून पती गणेश सुंदरराव गाडे, सासरा सुंदरराव बाबूराव गाडे (दोघे रा. बकरवाडी, ता. बीड), भाऊ नारायण अशोक निंबाळकर (रा. शृंगारवाडी, ता. माजलगाव), अंगणवाडी सेविका मनीषा शिवाजी सानप (रा.अर्धमसला, ता. गेवराई), प्रयोगशाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके (रा. आदर्शनगर, बीड), सीमा सुरेश डोंगरे यांच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. त्यातील सीमा हिने गुन्हा दाखल होताच पाली येथील तलावात आत्महत्या केली, तर इतर पाचही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, मनीषा कारागृहात आहे, तर इतरांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
‘लोकमत’ने केला पाठपुरावाया प्रकरणात पोलिसांची तपासाची गती संथ आहे. कसलेही प्रमाणपत्र सादर न करताच तपास अधिकाऱ्यांनी मनीषाची मानसिकता ठीक नसल्याचा बहाणा करून तिला न्यायालयीन कोठडीत पाठविले, तसेच लॅबवाला आणि नातेवाइकांना पोलीस कोठडी घेतली असली तरी त्यांच्याकडूनही धागेदोरे हाती लागत नव्हते. ज्याने मनीषाच्या घरी येऊन शीतलचे गर्भलिंग निदान केले, त्याचाही शोध लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. हे सर्व प्रकरण ‘लोकमत’ने सुरुवातीपासूनच लावून धरले आणि पाठपुरावाही केला. त्यामुळेच पोलिसांनी तपासाची गती वाढविली. अखेर रविवारी सतीश सोनवणे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आता याच्यापासून आणखी काही लोकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
एका निदानासाठी १० हजार रुपयेएका गर्भलिंग निदानासाठी एजंट मनीषा सानप २५ हजार रुपये घेत होती. त्यातील १० हजार रुपये सतीशला मिळत होते. बाकी १५ हजार रुपयांवर मनीषा डल्ला मारायची. त्यामुळेच तिच्याकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडले आहे.
सतीश सोनवणे हा औरंगाबादचा असून, त्याला अहमदनगरमधून अटक केली आहे. तो एमबीबीएसचा विद्यार्थी असल्याचे सांगत आहे. आता आरोपी संख्या ७ झाली असून, एकीने आत्महत्या केली आहे. सहा आरोपी आमच्या ताब्यात आहेत. आता यातील मनीषा सानप हिलादेखील पोलीस कोठडी मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला आहे.- नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक, बीड