लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : दोन वषार्पूर्वी ग्राम पंचायतीत अविश्वास ठरावासाठी मदत न केल्याच्या रागातून एकाने सत्काराच्या कार्यक्रमातच विद्यमान सरपंचाच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी दुपारी बीड - कल्याण रोडवरील निरगुडी शिवारात घडली.
याप्रकरणी पाटोदा तालुक्यातील रोहतवाडीचे विद्यमान सरपंच पांडुरंग दादाराव नागरगोजे यांनी फियार्दीत नमूद केल्यानुसार जवळच असलेल्या मौजे बेदरवाडी येथे २०१६ साली ग्राम पंचायत मध्ये अविश्वास ठरावावरून नारायण धोंडीबा आमटे व रविंद्र महादेव रांजवण यांच्यात वाद झाला होता. यावेळी पांडुरंग नागरगोजे यांनी नारायण आमटे यांना सहकार्य केल्याने बेदरवाडी येथील देवचंद रामा दरेकर याने त्यांना शिवीगाळ करून धमकी दिली होती.
दरम्यान, मागील महिन्यात पार पडलेल्या निवडणुकात पांडुरंग नागरगोजे यांची रोहतवाडीच्या सरपंचपदी निवड झाली. रविवारी बीड - कल्याण रोडवरील निरगुडी शिवारातील एका हॉटेलवर नागरगोजे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी नागरगोजे तिथे गेले असता देवचंद दरेकर याने मागील वर्षी आमच्या ग्राम पंचायतच्या अविश्वास ठरावात आमच्या पार्टीला का मदत केली नाहीस, असे म्हणत नागरगोजे यांच्या डोक्यात दगड मारला आणि नंतर बेदरवाडीच्या दिशेने पळ काढला. याप्रकरणी आरोपी देवचंद रामा दरेकर याच्यावर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.