-सोमनाथ खताळबीड - पाच मित्रांच्या गप्पा सुरू होत्या. पार्टी, मौजमजा करण्याचे ठरले. परंतु, कोणाकडेच पैसे नाहीत. म्हणून त्यांनी गावातीलच खिल्लारी बैलजोडी चोरून ती विकायची आणि आलेल्या पैशांतून ऐश करायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे बैलजोडी चोरलीही, परंतु ग्राहक शोधत असतानाच आणि ती विक्री होण्याआधीच या पाचही मित्रांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी बीड तालुक्यातील पेंडगावजवळ केली.
कृष्णा नवनाथ रूपनर (वय २२), संतोष निवृत्त भिसे (वय १९), रोहित कटाळू लांडगे (वय २१), रामा रमेश गोरे (वय २१), सजिम दस्तगिर शेख (वय २२ सर्व रा. हिवरापहाडी, ता. जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत. हे पाचही आरोपी मित्र आहेत. यांना ऐश करण्यासाठी पैशांची चणचण जाणवत होती. गावात कोणी पैसे देणार नाही, म्हणून त्यांनी बैल चोरण्याचा प्लॅन आखला. त्याप्रमाणे १५ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास गावातीलच संपती सुळ यांच्या शेतातून पांढऱ्या रंगाची दीड लाख रुपये किमतीची खिल्लारी बैलजोडी पिकअपमध्ये घालून चोरी केली. १६ ऑगस्ट रोजी त्यांनी हे पिकअप बीड शहरालगत फिरवले. दोघेजण बैलांसोबत राहिले, तर दोघांनी ग्राहक शोधण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बाजुला सुळ यांनी पिंपळनेर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली होती. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडे येताच पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक संजय तुपे यांनी तपास सुरू केला. त्यांना ही बैलजोडी पेंडगावजवळ असल्याचे समजले. त्यांनी सापळा रचून अगोदर बैलजोडी ताब्यात घेतली. शिवाय तिघांना बेड्या ठोेकल्या. त्यांच्याकडून इतर दोघांची माहिती घेतल्यावर त्यांना बीड शहरातून ताब्यात घेण्यात आले. या सर्वांकडून बैलजोडीसह पिकअप वाहन जप्त करण्यात आले. पिंपळनेर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय तुपे, तुळशीराम जगताप, कैलास ठोंबरे, नसीम शेख, भागवत शेलार, अशोक दुबाले, राहुल शिंदे, सतीश कातखडे, विकी सुरवसे आदींनी केली.