बीड : कॉलेजमध्ये मुलासोबत का बोलत होतीस? असे म्हणत एका शिक्षकासह दहा ते बारा जणांनी १९ वर्षाच्या विद्यार्थीनीला काठीने तसेच चापट, बुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले, त्यापैकीच एकाने वाईट हेतुन तिची छेड काढली. या प्रकरणी सदर विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिक्षकासह बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीड तालुक्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या महाविद्यालयीन तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १५ मार्च रोजी ती बारावीची परीक्षा देण्यासाठी नियमितपणे परीक्षा केंद्रात आली होती. परीक्षेआधी गावाकडील मुलाशी बोलत होती. त्यावर परीक्षा केंद्रावरील प्रा. अशफाक यांनी कॉलेजमध्ये मुलासोबत का बोलत होतीस? असे विचारत विद्यार्थिनीला धारेवर धरले. त्यानंतर सदर शिक्षकाने त्याच्या नातेवाईकासह दहा- बारा जणांना बोलावून घेतले. त्या विद्यार्थिनीला आॅटोरिक्षामध्ये बळजबरीने बसवून शहरातील झमझम कॉलनीत नेले. तेथे दहा- बारा जणांनी मिळून तु कॉलेजमध्ये मुलासोबत का बोलत होतीस, अशी विचारणा करत तिला काठी, बुक्की, चापटाने डोक्यावर, पायावर, नाकावर, ओठावर मारहाण केली. या जमावातील एकाने वाईट हेतुने छेड काढली. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाणीत जखमी विद्यार्थिनीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.याप्रकरणी तिने दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रा. अशफाकसह इतर दहा ते बारा जणांविरुद्ध विनयभंग, पळवून नेणे, धमकावणे, मारहाण करणे आदी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक ढगारे करीत आहेत.
बीडमध्ये विद्यार्थिनीला मारहाण; शिक्षकासह १२ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:15 AM