प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. मतदान केल्याची खूण म्हणून मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर (बोटावर) शाई लावण्यात येते. अशा शाईच्या ३ लाख बाटल्या महाराष्ट्रात आणण्यात आल्या आहेत. त्यातील ६ हजार ९७५ बाटल्या बीड मतदार संघातील २३२५ मतदान केंद्रावर पाठवण्यात आल्या आहेत. येथील २० लाख ४१ हजार १८१ मतदारांच्या तर्जनीवर खूण करण्यासाठी जवळपास १०० लिटर शाईचा वापर करण्यात येणार आहे.गुरुवारी बीड लोकसभेसाठी मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त व तयारी करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रावर मतदानाचे साहित्य पोहचवण्यात आले असून, प्रशासनाची सर्व यंत्रणा गतीमान झाली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे. सर्व साहित्यामध्ये मतदान यंत्रासह मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटावर लावण्यात येणारी शाईदेखील आहे. मतदान केल्यानंतर मतदारांच्या तर्जनीवर निळी शाई लावण्यात येते. बीड लोकसभा मतदारसंघात २० लाख ४१ हजार १८१ मतदार आहेत. तसेच २३२५ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक बुथवर तीन शाईच्या बाटल्या ठेवण्यात येणार आहेत. एका बाटलीमध्ये १० मिली निळी शाई असते.या एका बाटलीमधून किमान ३५० मतदारांच्या तर्जनीवर निळ््या शाईचे निशान लावले जाणार आहे. २००४ साली मतदारांच्या बोटावर केवळ एक ठिपका निळया शाईचा लावण्यात येत होता. मात्र, २००६ साली निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार ठिपक्याऐवजी बोटावर सरळ रेषा आखण्यात येत असल्यामुळे शाई जास्त लागत आहे. अशी माहिती निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर यांनी दिली.कोणत्या बोटावर लागते शाई ?मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला मतदान केंद्रात प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. जर तर्जनीवर शाई लावलेली असेल तर त्या मतदाराला मतदान करु दिले जात नाही. बोगस मतदान रोखण्यासाठी ही उपाययोजना १९६२ सालापासून राबविण्यात येत आहे.
म्हैसूरची शाईसंपूर्ण देशात मतदानाच्या वेळी म्हैसूरची शाई वापरण्यात येते. येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये ती तयार करण्यात येते. या कंपनीपासून जगातील २५ देशांना निवडणूक शाईचा पुरवठा केला जोतो. ही शाई तर्जनीवर लावल्यानंतर ती पुसत नाही त्यामुळे मतदार ओळखणे सोपे जाते. ही या शाईची खासियत आहे.