भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या डॉ. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांच्यात मुख्य लढत होत आहे. २००४ चा अपवाद वगळता १९९६ पासून २०१४ पर्यंत भाजपाला साथ देणाऱ्या या मतदारसंघात गेल्या पोटनिवडणुकीतही विक्रमी मताधिक्याने 'कमळ' उमललं होतं. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर या यशाची पुनरावृत्ती डॉ. प्रीतम मुंडे करतात, की बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसला 'अच्छे दिन' दाखवतात, याबद्दल उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून अकराव्या फेरीनंतर प्रीतम मुंडे यांनी ५१००० मतांची आघाडी घेतली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात एकूण 20 लाख 41 हजार 181 मतदार असून यंदाच्या निवडणुकीत 66.06 टक्के मतदान झालंय. झालेले मतदान 13 लाख 48 हजार 473 ईतके आहे. गेल्या पोटनिवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे ह्या जवळपास सात लाखाच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. मुंडे यांना 9 लाख 22 हजार 416 मतांसह विजय साकारला होता, तर काँग्रेसचे उमेदवार अशोकराव पाटील यांना 2 लाख 26 हजार 95 मतं मिळाली होती.