- संजय खाकरेपरळी: बीड लोकसभेची जागा खा .प्रीतम मुंडेच लढवितील, मी खा.प्रीतम मुंडे यांची जागा घेणार नाही, अशी स्पष्टोक्ती भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिली. त्या राज्यव्यापी शिव-शक्ती परिक्रमेच्या समारोप प्रसंगी बोलत होत्या. यामुळे पंकजा मुंडे लोकसभेची निवडणूक लढवू शकतात अशा चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अखेरच्या श्रावण सोमवारी आज सकाळी प्रभू वैद्यनाथास अभिषेक केला. त्यानंतर वैद्यनाथ मंदिरासमोरील प्रवचन मंडप सभागृहात महामृत्यंजय जपाने परिक्रमेचा समारोप दुपारी 1 वाजता करण्यात आला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचं शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. शिव-शक्ती परिक्रमेचे राजकारणाच्या पलीकडे जाऊन स्वागत झाले आहे, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे सर्वत्र नाव आहे त्याचा आपल्याला अभिमान आहे. या परिक्रमा यात्रेचे यश गोपीनाथराव मुंडे यांना समर्पित करते, अशा भावना पंकजा यांनी व्यक्त केल्या. तसेच प्रीतम मुंडे मागील १० वर्षांपासून खासदार आहेत. त्यांची जागा मी घेणार नाही, हा माझा निर्णय आहे, अशी स्पष्टोक्ती पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.
यावेळी बीड जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे, बंकटराव कांदे, बीड जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, भाजपाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया,तालुका अध्यक्ष सतीश मुंडे ,भाजपा शहर उपाध्यक्ष महादेव इटके, राजेंद्र ओझा अश्विन मोगरकर, नितीन समशेट्टी ,यांच्या इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
अशी होती शिवशक्ती परिक्रमा यात्रा शिव आणि शक्तीचे दर्शन घेण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची परिक्रमा बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री घृष्णेश्वराच्या दर्शनाने सुरू केली . राज्यातील जवळपास बारा जिल्हे आणि चार हजार किमीचा प्रवास परिक्रमेचा होता या परिक्रमेचा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून गांवोगावी जंगी स्वागत झाले.
शिव-शक्ती परिक्रमेचा प्रवास:घृष्णेश्वर ( छत्रपती संभाजीनगर) त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक),भीमाशंकर (जि. पुणे)औंढा नागनाथ (जि. हिंगोली)परळी वैजनाथ (जि. बीड ) ---सप्तश्रृंगी गड वणी (जि. नाशिक), दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रास भेट, जेजुरी, दुपारी १२.१५ वा.शिखर शिंगणापूर दर्शन (जि. सातारा)कोल्हापूर (जि. कोल्हापूर) येथे अंबामातेचे दर्शन पंढरपूर(जि.सोलापूर), अक्कलकोट . गाणगापूर दर्शन, तुळजापूर (जि. धाराशीव) भवानी देवीचे दर्शन.