Bajrang Sonawane ( Marathi News ) :बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली आहे. सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा जवळपास ७ हजार मतांनी पराभव केला. विविध कारणामुळे निवडणूक काळात राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. बीडमध्ये अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी वाजली आहे. या विजयानंतर बजरंग सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत जनतेचे आभार मानले आहेत.
"मला आशीर्वाद देणाऱ्या मतदारसंघातील जनतेचे मी आभार मानतो. बीड जिल्ह्यातील जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे. मला सुरुवातीपासूनच विजयाचा विश्वास होता. त्यामुळेच मी आधीपासून सांगत होतो की ४ जून रोजी बीडचा खासदार बजरंग सोनवणेच होणार. बीडच्या मायबाप जनतेनं एवढ्या धनदांडग्यांविरोधात माझ्यासारख्या गरिबाच्या पोराला निवडून दिलं," अशा शब्दांत बजरंग सोनवणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जरांगे फॅक्टरविषयी काय म्हणाले सोनवणे?
जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देत असताना पत्रकारांनी बजरंग सोनवणे यांना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयीही प्रश्न विचारला. जरांगे पाटील फॅक्टर तुमच्या मतदारसंघात कामी आला का? या प्रश्नावर बोलताना सोनवणे म्हणाले की, "१०० टक्के हा फॅक्टर कामी आला. मराठा आरक्षण चळवळीचा मला फायदा होईल आणि या आरक्षणाचा प्रश्न मी संसदेत मांडणार, असंच मी सुरुवातीपासून बोलत आहे."
बीडच्या निवडणुकीत नेमकं काय झालं?
मतमोजणी सुरू असताना २४ व्या फेरी अखेर भाजपाच्या पंकजा मुंडे यांना ३० हजार ४६१ मतांची आघाडी होती. मात्र, २५ व्या फेरीपासून ही आघाडी घटू लागली. २५ व्या अखेर २२ हजार ५००, २६ वी फेरी १० हजार २७६ , २७ वी फेरी ७ हजार ४२८ अशी आघाडी कमी होत गेली. तर २८ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी ९३२ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर २९ व्या फेरीत १ हजार २१७, ३० वी फेरी २ हजार ६०२ मतांची आघाडी घेतली. मात्र, ३१ व्या फेरीत पुन्हा पारडे फिरले अन् पंकजा मुंडे ४०० मतांनी पुढे आल्या. परंतु, फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर झालेल्या मतमोजणीत शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे ७००० मतांनी विजयी झाले.