वडवणी ( बीड) : शहरातील चिंचवण रोडवरील पतंगे ट्रेडर्स या तीन मजली दुकानाला आज, गुरुवारी ( दि. ६) सकाळी सहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. दुकानामधील फर्निचर, प्लायवूड, कलर आणि अन्य बांधकाम साहित्याचा मोठा साठा आगीत जळून लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
सकाळी आग लागल्याची माहिती मिळताच दुकान मालक विशाल पतंगे आणि नागरिकांनी चिंचवण रोडवरील दुकानाकडे धाव घेतली. मात्र, शहरात केवळ अग्निशमन गाडी असून प्रशिक्षित कर्मचारीच नसल्याने आगीत दुकानाची राख होताना नागरिक आणि दुकान मालक हतबलतेने पाहत होते.
कलर आणि प्लायवूडने आगीचे रौद्ररूपदुकानामध्ये खालच्या मजल्यावर फर्निचर तर वरच्या मजल्यावर सनमाईक, प्लायवूड, कलर यासह अन्य बांधकाम साहित्य आहे. हे साहित्य ज्वलनशील असल्याने आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. त्यात अग्निशमन यंत्रणा तोकडी पडल्याने संपूर्ण दुकानास आगीने कवेत घेतले. दरम्यान, तेलगाव, माजलगाव आणि बीड येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले आहे.
व्यापाऱ्यांमध्ये रोषभीषण आग लागलेली असताना कर्मचाऱ्यांच्या अभावी नगरपंचायतचे अग्नीशमन दल शोभेची वस्तु बनले आहे. स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजनांचे अभाव असल्याने आगीत दुकान राख होताना पहावे लागत आहे. सकाळची वेळ असल्याने दुकानात कोणीच नव्हते. यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, सक्षम यंत्रणे अभावी दुकानाची राख होताना पहावे लागत असल्याने शहरातील नागरिक आणि व्यापारी वर्गात प्रशासन विरोधात नाराजीचा सुरू उमटला आहे.