लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कोणतीही करवाढ न करता २०१८-१९ या वर्षाकरीता शहर विकासासाठी २८६ कोटींचा अर्थसंकल्प नगरपालिकेत बहुमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा विचार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
शहरातील समस्या ‘आ’ वासून नागरिकांपुढे उभ्या आहेत. सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा, परिसरांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, रस्ते व शहरातील रसत्यांवरील खड्डे, विद्युत पुरवठा, शाळा, सिग्नलची व शहरातील उद्यानांची झालेली दुरवस्था व इतर अनेक मूलभूत गरजा आहेत. यासाठी भरीव तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचेही डॉ.क्षीरगसार म्हणाले.
मागच्या वर्षी नगरपालिकेकडून ८६ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. या तुलनेत यावर्षीचा अर्थसंकल्पाची रक्कम १९७ कोटी रूपयांनी जास्त म्हणजे २८६ कोटी इतकी आहे. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते काँक्रिटीकरण, भूमिगत गटार योजना, शहरातील उद्यानांचे सुशोभिकरण, पथदिवे तसेच कचरा व्यवस्थापन या पायाभूत योजनांचा समावेश या अर्थसंकल्पात असल्याचेही डॉ.क्षीरसागर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, कोणतीही करवाढ नसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र शहराचा गाडा हाकण्यासाठी कर भरण्याचे आवाहन न.प.कडून करण्यात आले आहे. बांधकाम परवानगीसाठी आॅनलाईन सुविधा केल्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे. याचबरोबर शहरातील नवीन ४० हजार स्थावर संपत्तींची नोंद नगरपालिकेकडे नव्हती ती करण्यात आल्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ झाल्याचेही क्षीसागर यांनी पत्रकार परिषेदेत स्पष्ट केले. यावेळी त्यांनी इतर मुद्यांवरही चर्चा केली.
यावेळी सभापती मुखीद लाला, विकास जोगदंड, गटनेते सादेक उज्जमा, विनोद मुळूक, भीमराव वाघचौरे, नरसिंग नाईकवाडे, गुरखुदे, गणेश वाघमारे, विनित काळे आदी उपस्थित होते.दरम्यान, यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील सर्व योजना मंजुर होतील व सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील, असे अश्वासनही शेवटी डॉ.क्षीरसागर यांनी दिले.
नगरापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष हे शहर विकासाच्या विरोधात आहे, त्यांच्याकडून वैयक्तिक विरोधासाठी शहराच्या विकास कामांमध्ये अडवणूक करण्यात येत आहे. विरोधी पक्षाला लोकशाही मूल्य काय असतात, हे माहिती नाही. विकास कामांमध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही.यापूर्वी देखील नगरपालिकेमध्ये शिवसेना - भाजप हे विरोधीपक्ष होते, मात्र त्यांनी विकास कामाला कधी विरोध केला नाही. विकासाच्या बाजूने कोण आहे, हे जनतेला माहिती आहे, असे सांगून त्यांनी विविध मुद्यांवरून काकू-नाना आघाडीवर अप्रत्यक्ष आरोप डॉ. क्षीरसागर यांनी केला.
पाणीपुरवठाशहरातील पाणीपुरवठा सुरळीत व नियमीत करण्यासाठी अमृत अभियान योजनेंतर्गंत ११४ कोटींची तरतूद आहे.उद्यानेखासबाग, यशंवत उद्यान, धांडे नगर, मोमीनपूरा व इतर ठिकाणच्या उद्यान निर्मीतीसाठी २.९४ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
भुयारी गटार योजनायावर्षी पहिल्या टप्प्यात भूमिगत गटार योजनेसाठी १६५.८० कोटी तर दुसºया टप्प्यातील योजनेसाठी ८३.१४ इतकी तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नगरापालिकेचा वाटा २५ टक्के असणार आहे.
विद्युत विभागशहरात १६०० विद्युत खांब व गरजेनूसार रोहित्र उभारण्यात येणार आहेत. शहरात एलईडी पथदिवे बसवण्यात येणार आहेत.
स्वच्छता विभागशहरातील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या धरतीवर प्रत्येक प्रभागात हे राबवण्यात येणार आहे. याद्वारे विजेत्या प्रभागाला अनुक्रमे १०, ५ आणि ३ लाख रूपयांचे बक्षीस मिळणार आहे. भाजीमंडई आणि प्रमुख चौकांमध्ये ५० मीटर अंतरावर डस्टबीन ठेवण्यात आल्या आहेत. शहरातील मलेरिया विभागासाठी धूर फवारणीकरिता नवीन माऊंटेड मशीन खरेदी करण्यात आली असून, याद्वारे धूर फवारणी करण्यात येणार आहे.
पालिकेतील राजकारणामुळे विकासाला खिळपालिकेची निवडणूक झाल्यापासून ते आजपर्यंत बीड पालिकेत राजकारण सुरू आहे. काका-पुतण्याचा वाद बीड शहरातील नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्याच्या भावना नागरिकांमधून व्यक्त होत होत्या. तसेच इतर पक्षांनीही या काका-पुतण्यावर कडाडून टिका केली होती. या दोघांच्या राजकारणामुळेच शहराच्या विकासाला खिळ बसल्याचा आरोपही केला जात होता, परंतु ते खोडून काढण्याचे आव्हान आता नगराध्यक्षांपुढे असणार आहे.