बीड : बीड पालिकेकडून कर थकविणाऱ्यांना अभय दिले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. यावर पालिका खडबडून जागी झाली आणि अवघ्या पाच दिवसांत तब्बल १९ लाख रूपयांचा कर वसूल केला आहे. कर अधीक्षकांपासून सर्वच कर्मचारी कर वसुलीसाठी सकाळीच कार्यालयाबाहेर पडताना दिसत आहेत.बीड पालिकेच्या कर वसुलीचा टक्का खुपच कमी आहे. १५ पैकी केवळ चारच कोटी वसुली झाली होती. ११ कोटी थकबाकी असताना पालिकेचा वसुली विभाग वसुलीसाठी आखडता हात घेत असल्याचे दिसून येत होते. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून प्रकार निदर्शनास आणला. त्यानंतर पालिका खडबडून जागी झाली अन् मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी तातडीची बैठक बोलावून सर्वच कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्या. कारवाईच्या भीतीने कर अधीक्षकांपासून ते कर्मचा-यांपर्यंत सर्वचजण सकाळी ८ वाजताच कर वसुलीसाठी कार्यालयाबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यापासून पाच दिवसात १९ लाख ६ हजार ८८० रूपये कर वसूल झाला आहे. मुख्याधिकारी दोरकुळकर यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक सय्यद इद्रीस व त्यांचे पथक काम करताना दिसत आहे.
बीड पालिकेचा पाच दिवसांत १९ लाखांचा कर वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 11:52 PM
बीड पालिकेकडून कर थकविणाऱ्यांना अभय दिले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. यावर पालिका खडबडून जागी झाली आणि अवघ्या पाच दिवसांत तब्बल १९ लाख रूपयांचा कर वसूल केला आहे.
ठळक मुद्देकारवाईला सुरूवात : कर अधीक्षकांसह कर्मचारी लागले कामाला