"सत्ता असूनही सत्ताधारी यश मिळवण्यात कमी पडले आहेत. लोकांनी भाजपलाच (BJP) पहिली पसंती दिली. राज्यातील निकाल पाहिले. त्यातही लोकांनी भाजपलाही साथ दिली. बीडमध्येही ज्या नगरपंचायती होत्या त्यात भाजपला बहुमत मिळालंय असं चित्र स्पष्ट झालंय. बीड जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचेही मी आभार मानते," अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी त्यांना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) विरुद्ध पंकजा मुंडे (Pankaja Munde) अशी लढत होती का? असा सवाल विचारण्यात आला. "बीडमधील लढत ही तुम्ही समजता तशी नव्हती. एका मतदारसंघाचं नेतृत्व आणि जिल्ह्याचं पालकत्व यात खुप फरक आहे. बीड जिल्ह्याचं जे चित्र आहे ते गेल्या अडीच वर्षांतील कामकाजाचा राग, रोष आणि आमच्या काळातील कामावरचा विश्वास आहे. आता बीड जिल्ह्यातील लोकांनी भविष्यात काय असेल याचेच संकेत दिले आहेत, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी एक ट्वीटही केलं. "बीडमध्ये मिळालेला विजय आणि राज्यात ठिकठिकाणी मिळालेला विजय हा संपूर्णपणे कार्यकर्त्यांचा आहे... लढाई कड़ी है पर तैयारी और उम्मीद बड़ी है," असं त्यांनी ट्वीटद्वारे म्हटलं.