सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: जिल्ह्यातील १९१ गावांतील १९७९ कुटुंब मागील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांवर ऊसतोडणीला गेली. त्यांच्यासोबत ० ते १८ वयोगटातील १९०३ मुले होती. आई-वडील पुढे ऊस तोडत असताना ही मुले चक्क उसाच्या फडात झोपलेली असायची. ही आकडेवारी कोल्हापूरच्या अवनी संस्थेने केेलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. राज्यातील इतर जिल्हे आणि राज्यांमधील मुलांचा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता आहे. यावर्षी तरी मायबाप सरकारने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. प्रत्येक वर्षी लाखापेक्षा जास्त मजूर ऊसतोडणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि इतर जिल्ह्यांसह परराज्यात जात असतात. मागील वर्षीही जिल्ह्यातील १९१ गावांतील मजूर एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांवर गेली होती. त्यांच्या मुलांची माहिती कोल्हापूरच्या अवनी संस्थेने काढली. त्याची नावा-गावासह यादी जिल्हा प्रशासनाला दिली असून तसेच ० ते ६ वयोगटातील मुलांना डे केअर सेंटर आणि सात वर्षांवरील मुलांना शाळांमध्ये दाखल करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून भयाण वास्तवही समोर आले आहे.
बीडमध्ये १२ वसतिगृहे
- चालू वर्षात मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने मुलींसाठी सहा आणि मुलांसाठी सहा असे १२ वसतिगृहे सुरू केली आहेत.
- याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच पहिली ते चौथीपर्यंतची मुले पालकांसोबत जाणार नाहीत, यासाठी आरटीईअंतर्गत त्यांना शाळेत प्रवेश देण्यात यावा, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
यावर्षी मजुरांचा आकडा वाढणारअवनी संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वेक्षण केले आहे; परंतु जिल्ह्यातील मजूर हे इतर जिल्हे आणि राज्यात जातात. हा आकडा आणखी वाढू शकतो. ...तरीही मुलांची हजेरी कशी?मुले पालकांसोबत ऊसतोडणीसाठी जात असतात; परंतु इकडे जिल्ह्यातील शाळांमध्ये त्यांची हजेरी दाखवली जाते; तसेच काही लोक हंगामी वसतिगृह चालू करून त्यात मुलांची बोगस नावे दाखवून अपहार करतात. याचीही तपासणी शिक्षण विभागाने करावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.