परळी: बीड जिल्ह्यातील परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील राख साठवणूक तलावात राख मोकळी करण्यासाठी जिलेटीनचा वापर करून ब्लास्टिंग करण्याचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी दोघाना परळी ग्रामीण पोलिसांनी शनिवारी अटक केली. हरीचंद्र चव्हाण व बालाजी जाधव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी व परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
औष्णिक विद्युत केंद्राचा परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र आहे, या ठिकाणी जिलेटिनच्या कांड्याचा वापर केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी या जिलेटिनच्या कांड्याचा वापर जमलेली राख मोकळी करण्यासाठी करणार होते. कांड्या आणि वायरिंगवगैरे सर्व तयारी झाली होती, पण त्यापूर्वीच परळी ग्रामीण पोलिसांना आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून तब्बल 103 जिलेटिनच्या कांड्या व वायर जप्त करण्यात आले आहे. परळी ग्रामीण पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली.
परळी औष्णिक विद्युत केंद्रात वीज निर्मितीसाठी दगडी कोळशाचा वापर केला जातो, कोळसा जळल्यानंतर पाईपलाईनद्वारे त्याची राख विद्युत केंद्राच्या परिसरातील दाऊतपुर शिवार येथील राख साठवण केंद्रात सोडली जाते. या राखेचा वीट, सिमेंट आदी कामांमध्ये वापर केला जातो. बऱ्याच काळापासून पडलेली राख मोकळी करण्यासाठी ही ब्लास्टिंग केली जात होती. पण, विद्युत केंद्राच्या सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच ही बाब निदर्शनास आणली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास एपीआय खोडेवाड हे करत आहेत.
'औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या राख तळ्यात राख मोकळी करण्यासाठी जिलेटीन नामक स्फोटके वापरत असल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांना आढळून आले. यानंतर कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून सदरील 3 व्यक्तींना पकडून ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रास काही धोका नसून, औष्णिक वीज निर्मिती केंद्र घटनास्थळापासून 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. सदरील घटनेमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.- मोहन आव्हाड, मुख्य अभियंता, परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र.