बीड: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी बीडमधील एका कट्टर शिवसैनिकाने तिरुपती बालाजीपर्यंत पदयात्रा काढली होती. पण, या पदयात्रेदरम्यान त्या शिवसैनिकाचे निधन झाले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी सुमंत रुईकर (Sumant Ruikar) व त्यांच्या मित्रासह तिरुपती बालाजीकडे पायी निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्याने कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने रुईकर यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच मृत्यूसुमंत रुईकर यांनी बीड ते तिरुपती असा 1100 किमी पायी चालत जाण्याचा निश्चय केला होता. 1 डिसेंबरला ते तिरुपतीच्या दिशेने निघाले होते. उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठिक व्हावी आणि शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये यश मिळावे यासाठी रुईकर चालत जात होते. 31 डिसेंबरपर्यंत त्यांना तिरुपतीला पोहचण्याचा संकल्प होता. पण, ताप आल्यामुळे वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
यापूर्वीही केली होती पायी यात्रासुमंत रुईकरांच्या मृत्युने बीड शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सुमंत रूईकर यांनी यापूर्वी 2019 मध्ये उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बीड ते तिरुपती पायी यात्रा केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर उध्दव ठाकरेंनी सुमंत रुईकर यांचा कौतुक करत सत्कार केला होता.