लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड पंचायत समितीचे उपसभापती मकरंद उबाळे यांनी शिवसंग्रामच्या नेत्यांचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप करत राजीनामा दिला होता. मात्र, संख्याबळ घटून उपसभापती पद विरोधीपक्षाकडे जाण्याच्या भितीने उबाळे यांचा राजीनामा मंजूर करण्यास विलंब लावला जात आहे.बीड पंचायत समितीमध्ये शिवसंग्रामचे तीन, शिवसेना तीन व आ.जयदत्त क्षीरसागर समर्थक दोन असे मिळून सत्ता स्थापन केली होती. पं.स.सभापतीपद शिवसंग्रामकडे तर शिवसेनेला उपसभापतीपद मिळाले होते. मात्र, पं.स.च्या माध्यमातून सामान्यांची कामे होत नाहीत. मागील दोन वर्षात कोणत्याही योजना राबवल्या गेल्या नाहीत. त्याचसोबत पं.स. कारभारात आ. मेटे व आ. क्षीरसागर यांचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप करत मागील आठवड्यात मकरंद उबाळे यांनी राजीनामा दिला होता. मात्र, या राजीनाम्यावर सभापती कसलाच निर्णय घ्यायला तयार नाहीत. विशेष म्हणजे हा राजीनामा घ्यायलाच सभापती तयार नसल्याची माहिती आहे. यामुळे आता या राजीनाम्याचे करायचे काय असा प्रश्न पं.स. प्रशासनासमोर आहे. दरम्यान शिवसंग्रामकडून अजूनही उबाळेंची मनधरणी सुरु असली तरी ते राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचे समजते.सुरुवातीला उबाळे यांनी लेटरहेडवर राजीनामा दिला होता. मात्र त्यांना राजीनामा द्यायचाच असेल तर विहित नमुन्यात द्यावा लागेल असे पं.स. सभापतींकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार उबाळेंनी गटविकास अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यात सभापतींच्या नावे राजीनामा दिला आहे. मात्र, सभापती सदर राजीनामा मंजूर करण्यास तयार नाहीत. उपसभापतींच्या राजीनाम्यावर स्वीकृत अथवा अस्वीकृत असा निर्णय घेण्याचे अधिकार सभापतींना आहेत. मात्र सभापती राजीनामा पाहायलाच तयार नसल्याने पंचायत समिती प्रशासन हतबल झाले आहे. यासंदर्भात बीडीओ व उपमुख्यकार्यकारी अधिकाºयांशी संपर्क होऊ शकला नाही.मेटेंनी दिले होते आश्वासनबीड पंचायत समिती सत्तास्थापन करण्यापूर्वी आ. मेटे म्हणाले होते मुख्यमंत्र्याशी माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विविध योजनेसाठी निधी खेचून आणू. मात्र, सत्ता स्थापन झाल्यापासून कोणत्याच नवीन योजना सुरु झाल्या नाहीत. तसेच जी कामे व शेतकºयांच्या विहिरी सुरु होत्या त्या देखील बंद पडल्या आहेत. त्यामुळेच मकरंद उबाळे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा प.स. परिसरात रंगली आहे.
बीड पं.स. उपाध्यक्षांचा राजीनामा होईना मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:24 AM