बीड : कुटूंबियांना चकवा देत लग्न करण्यासाठी अमरावतीला निघालेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील चिंचपूर येथील सैराट जोडप्याला बीड पोलिसांनी शहरातून ताब्यात घेतले. सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. कायदेशीर कारवाई आणि जबाब घेऊन त्यांना कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. अल्पवयीन मुलीला पळवून नेत अमरावतील जावून लग्न करण्याचा प्लॅन बीड पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला.
राम सावंत (२३ रा.चिंचपुर बुद्रुक ता.परंडा जि.उस्मानाबाद) असे मुलाचे नाव आहे. राम हा जेसीबी चालक आहे. सध्या तो अमरावतीला असतो. मागील दोन वर्षांपूर्वी त्याची शेजारच्या सुहासिनी (वय १७, नाव बदललेले) सोबत ओळख झाली. ओळखीतून प्रेम झाले. तेव्हा सुहासिनी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. सलग दोन वर्षे त्यांचे फोनवरून बोलणे वाढले. दोन दिवसांपूर्वी राम हा गावाकडे लायसन दुरूस्तीसाठी आला होता. याचवेळी त्यांनी पळून जात लग्न करण्याचा निर्णय घेतला. रविवारी सायंकाळी ते घरातून दुचाकीवर बाहेर पडले. परंड्याला येत तेथून जामखेडला गेले. तेथे आत्याकडे दुचाकी सोडली आणि बसने बीडला आले.
अमरावतीला जाण्यासाठी बसची वाट पहात ते स्थानकातील ३ फलाटवर बसले होते. याच दरम्यान शिवाजीनगर ठाण्याचे रात्र गस्त घालणारे सपोनि बिपीन शेवाळे, रविंद्र राऊत, किशोर जाधव, विकास उजगरे यांनी स्थानकात पाहणी केली. यावेळी त्यांना या जोडप्यावर संशय आला. त्यांनी चौकशी केली असता खरा प्रकार समोर आला. दोघांनाही ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. नातेवाईक उस्मानाबाद पोलिसांना संपर्क करून माहिती देण्यात आली. सोमवारी दुपारी जोडप्यासह त्यांच्या कुटूंबियांचे जबाब घेऊन त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.