बीड : वय अवघे १४ वर्षे.. परिस्थिती हलाखीची... आई अंध.. भीक मागून पोटाची खळगी भरणे सुरू असतानाच जावेद शेख या नराधमाच्या वासनेची ती बळी ठरली. वारंवार अत्याचार झाल्याने ती गर्भवती राहिली. एवढ्या कोवळ्या वयात तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
मागील दीड महिन्यापासून बीड शहर पोलीस पीडितेची काळजी घेत होते. विशेष म्हणजे तिचे बाळंतपणही पोलिसांनीच केले. पोलिसांकडून माणुसकीचा आधार मिळाल्याने पोलिसांबद्दल आदर निर्माण झाला आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनानेही तिला मायेची उब दिली. याप्रकरणातून खाकी अन् अॅप्रनमधील ‘माणुसकी’ अजूनही जिवंत आहे, हे स्पष्ट झाले. १९ नोव्हेंबर रोजी बीड शहर पोलीस ठाण्यात एका प्रकरणाची फिर्याद दाखल झाली. नेहमीप्रमाणे हा बलात्काराचा गुन्हा असेल, असे सर्वांना वाटत होते. परंतु पोलिसांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात लक्ष घातले नी प्रकरण समोर आले.
परिस्थितीचा फायदा घेऊन बशीरगंज भागात असलेल्या शेख जावेद या नराधमाने अवघ्या १४ वर्षीय मुलीवर सतत अत्याचार केला. वाच्यता केली तर जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे ती गप्प राहिली. अखेर याची वाच्यता झाली नी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी निवेदने दिली, मोर्चा काढला. त्यामुळे प्रकरण गंभीर झाले होते. पोलिसांनीही याप्रकरणाला गांभीर्याने हाताळण्याबरोबरच पीडितेला आधार दिला. गर्भवती असल्याने तिची देखभाल करण्यासाठी दोन महिला पोलीस कर्मचारी तैनात होत्या. पीडितेला रुग्णालयात दाखल करणे, तिची तपासणी करणे आदी काळजी त्या घेत होत्या.
२२ डिसेंबर रोजी तिला शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचा-यांनी जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केले. सायंकाळच्या सुमारास तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ही खबर जेव्हा शहर पोलीस ठाण्यात समजली, तेव्हा एकप्रकारे सर्वांना आनंद झाला. अनेकांना आनंदाश्रू आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणातून ‘खाकी’तील माणुसकीचे दर्शन घडले. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाण्याचे पोनि सय्यद सुलेमान व त्यांची टिम या प्रकरणात लक्ष ठेवून होते.जिल्हा रुग्णालयात नर्सकडून ‘प्रेम’जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर नेहमी ओरडून बोलणा-या, चिडणा-या परिचारिका (नर्स) आपण पाहत असतो. परंतु या प्रकरणात त्यांनीही आपल्यातील ‘राग’ बाजूला ठेवत पीडितेला ‘प्रेम’ दिले. पोलीस व जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या माणुसकीमुळेच ही पीडिता आज धैर्याने परिस्थितीचा सामना करीत आहे. यापुढेही प्रशासनाकडून अशाच कार्याची अपेक्षा सर्वांना आहे.