बीड : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हा पोलीस दल सरसावले आहे. आतापर्यंत तीन मेळावे घेतल्यानंतर मंगळवारी आणखी एक मोठा रोजगार मेळावा घेण्यात आला. यामध्ये बेरोजगारांची गर्दी उसळली. पहिल्या दिवसी तब्बल १०२५ उमेदवारांनी राज्यातील विविध २५ कंपन्यांसाठी मुलाखती दिल्या. बीड पोलिसांमुळे कंपन्यांमध्ये नौकरी मिळणार असल्याने बेरोजगारांच्या चेहºयावर हास्य दिसून येत होते. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी आलेल्या सर्व उमेदवारांना यशाचे कानमंत्र दिले.
गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हेगारी नष्ट करणारे बीड पोलीस आता कायद्याच्या थोडे बाजूला जावून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी सरसावले आहेत. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेतला जात आहे. यापूर्वी देखील एक वेळेस पोलीस दलाने मेळावा आयोजित केला होता. यामध्ये १३० उमेदवारांनी सहभाग नोंदविला होता. पैकी ६५ उमेदवारांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे. तसेच एक वेळेस नगर पालिका व जिल्हा उद्योग केंद्राने आयोजित केलेल्या मेळाव्यात पोलीस दलाने पुढाकार घेत उमेदवारांना आवाहन केले होते.
मंगळवारी पुन्हा एकदा मोठा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मागील पंधरा दिवसांपासून या मेळाव्याचे नियोजन व सहभाग नोंदविण्यासाठी आवाहन केले जात होते. अखेर हा मेळावा मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. यामध्ये युवक, युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक संचालक विजय सिसे, एम.बी.खिल्लारे, आर.डी.कटक, एम.ए.तांबोळी, पोलीस विभागाकडून प्रशांत जोशी, पोउपनि रामचंद्र आमटे, सय्यद जकीयोद्दीन, व्ही.बी.मिसाळ, लक्ष्मण जायभाये, विजय बरकडे, पठाण यांनी परिश्रम घेतले.
राज्यातील पहिला यशस्वी मेळावाराज्यात बीड पोलिसांनीच सुशिक्षितांसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. पहिला मेळावा छोटा घेतल्यानंतर मंगळवारी मोठा आणि यशस्वी मेळावा पार पडला. राज्यात पहिला आणि यशस्वी रोजगार मेळावा घेऊन तरूणांना रोजगार मिळवून देण्यात बीड पोलीस अव्वल राहिले. त्याबद्दल त्यांचे स्वागत होत आहे.
स्वत:च्या पायावर उभे रहावे
तरूणांना रोजगार मिळावा, त्यांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे, यासाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात तरूणांनी सहभाग नोंदविल्याने आम्हालाही आनंद झाला. २५ कंपन्यांमध्ये या तरूणांना रोजगार दिला जाणार आहे. असा मेळावा आयोजित केल्याचे समाधान वाटत आहे. - जी.श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड