बीड : बीड जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बीड पोलीस दलातील रेखा गोरे या महिला पोलीस नाईकने वाद विवाद स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. औरंगाबाद परीक्षेत्रातून रेखा गोरे या एकमेव स्पर्धक होत्या.
पोलीस महासंचालक कार्यालयाच्यावतीने मुंबई येथे मंगळवारी राज्यस्तरीय वाद विवाद स्पर्धा घेण्यात आल्या. बीडच्या रेखा गोरे यांनी ‘महाराष्ट्र राज्य मानवाधिकाराच्या दृष्टीने पुरोगामी आहे किंवा कसे’ या विषयावर सकारात्मक बाजू मांडली. राज्यातून आलेल्या ३३ स्पर्धकांना मागे टाकत आपल्या कौशल्यपूर्ण वक्तृत्वाने रेखा गोरे यांनी छाप टाकत प्रथम क्रमांकाच्या बक्षिसावर आपले नाव कोरले. त्यांनी पाच मिनीटांमध्ये आपले अभ्यासपूर्ण मत व्यक्त केले.
पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते गोरे यांना प्रशस्तीपत्र, रोख दहा हजार रूपये असे बक्षिस देऊन गौरव करण्यात आला. बाळासाहेब मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली त्या वक्तृत्वाचे धडे गिरवत आहेत. गोरे या सध्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील सखी सेलमध्ये कर्तव्य बजावत आहेत. गोरे यांच्या यशाने बीड पोलिसांची मान पुन्हा उंचावली आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोऱ्हाडे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार, सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे.