बीड : चोरी, घरफोडी, दरोडा आदी गुन्ह्यांत हस्तगत केलेला जवळपास साडे दहा लाख रूपयांचा किंमती मुद्देमाल मुळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. यामध्ये एका ट्रॅक्टरसह सात दुचाकी वाहनांचाही समावेश आहे. हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवारी सकाळी पार पडला.
मागील वर्षीपासून विविध गुन्ह्यांत हस्तगत केलेला मुद्देमाल मुळ मालक/फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्याचा कार्यक्रम प्रत्येक महिन्याला घेतला जातो. बुधवारीही हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, सहायक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी २२ गुन्ह्यांतील तब्बल १० लाख ६६ हजार ४८० रूपयांचा किंमती मुद्देमाल परत करण्यात आला.
यामध्ये एका ट्रॅक्टरसह सात दुचाकी, सोने, रोख रक्कम आदींचा समावेश होता. यावेळी आपला मुद्देमाल परत मिळाल्यानंरत फिर्यादींच्या चेह-यावर हास्य फुलल्याचे दिसले. अनेकांनी बीडपोलिसांनी घेतलेल्या या कार्यक्रमाबद्दल स्वागत केले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रमुख, मोहरीर, नागरीक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पोह. राम यादव यांनी हा मुद्देमाल परत करण्यासंदर्भात सर्व मोहरीरकडे पाठपुरावा केला होता.