बीड : मागील काही दिवसांपासून घरगुती वादातून चोरीचा बनाव करून पोलिसांची पळपळवी करण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार बुधवारी समोर आला. बीड शहरातील अंबिका चौकात झालेली चोरी नसून बनाव असल्याचे तपासातून समोर आले. दीड तोळ्याच्या गंठनसाठी सासू-सुनेचा वाद होता. सासूला गंठन न देण्याचा उद्देशाने सुनेने हा बनाव केला. यामध्ये मात्र पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. घराच्या बाहेर पडलेल्या ‘किल्ली’वरून हा तपास लागला.
बीड शहरातील अंबिका चौक हा नेहमी गजबजलेला असतो. ऐन चौकातील बाजूच्या अपार्टमेंटमध्ये संध्या व गोरख शिंदे हे दाम्पत्य राहतात. सकाळी आठ वाजता गोरख शिंदे हे परभणीला गेले होते तर संध्या शिंदे या पांगरी येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक असल्याचे सांगत सकाळी नऊ वाजताच घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर दहा वाजता मुलगा प्रमोद हा घरी आल्यावर त्याला हा चोरी झाल्याचे समजले, असे संध्या शिंदे यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांना काही मुद्दे खटकले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना तीन व्यक्ती घरात आल्याचे दिसले. सर्वांची शहानिशा केली असता एकावरही संशय बळावला नाही. त्यांनी मग संध्या शिंदे यांचीच चौकशी केली. त्यांना फिर्याद देण्यासाठी बोलाविले. परंतु त्यांनी नकार देत आपले पैसे व दागिने असल्याचे सांगितले.
पोलिसांनी खोलवर जावून तपास केल्यावर हा प्रकार घरगुती वादातून केल्याचे समजले. सासू-सुन या दोघींमध्ये दीड तोळ्याच्या गंठनसाठी वाद होता. सासू हे गंठन परत मागत होती, तर सुनेचा विरोध होता. सासुला गंठन न देण्याच्या उद्देशाने सुनेने घरात चोरी झाल्याचा बनाव केला आणि दीड तोळ्याच्या गंठनसह दहा हजार रूपये रोख रक्कम गेल्याचे पोलिसांना सांगितले होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे टिमसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना मुख्य गेटवर कुलपाची किल्ली सापडली. याच किल्लीने चोरीचा बनाव उघडा पाडण्यास मदत झाली. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पाळवदे, शिवाजीनगर ठाण्याचे पोनि नानासाहेब लाकाळ, फौजदार भूषण सोनारसह टिमने हा तपास लावला.
ग्रा.पं.बंदोबस्तामुळे व्यस्तमंगळवारी जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतसाठी मतदान असल्याचे पोलीस व्यस्त होते. हाच फायदा घेऊन या महिलेने चोरीचा बनाव केला. परंतु पोलिसांनी सर्व परिस्थिती सांभाळून हा बनाव उघड केला. खोटी माहिती देऊन पोलिसांची धावपळ करणे, हे चुकीचे असल्याची भावना व्यक्त होत असून यामुळे खर्या घटनांकडे दुुर्लक्ष होण्याची दाट शक्यता आहे.
तपास सुरु आहे घरगुती वादातून हा चोरीचा बनाव केला होता. सविस्तर तपास सुरूच आहे. संबंधितांवर कारवाई केली जाईल.- जी. श्रीधर पोलीस अधीक्षक, बीड