विकासाचा कलश घेऊन आलेल्या लाडक्या लेकीची मतदानाने ओटी भरा - पंकजा मुंडेपरळी : खा.डॉ. प्रीतमताई मुंडे ही आपली लेक असून साडेचार वर्षात तिने लक्ष्मीच्या रुपाने जिल्ह्यात विकासाचा सुवर्ण कलश आणला आहे. आपण आपल्या लाडक्या लेकीची मतदानाने ओटी भरून तिला भरभरून आशीर्वाद द्या, असे भावनिक आवाहन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. परळीत प्रचाराचा समारोप करताना त्या सभेत बोलत होत्या. धो-धो पाऊस सुरू असतानाही भाजप उमेदवार खा.डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ सभा सुरुच होती.पंकजा मुंडे म्हणाल्या की, आम्ही केंद्र आणि शासनाचा भरीव निधी जिल्ह्याच्या विकासासाठी डॉ प्रीतम मुंडे यांनी आणला. आपल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अतिशय भरीव अशी विकास कामे केली आहेत. त्यांना मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने करून दाखवले आहे. मात्र आंधळ्या विरोधकांना आम्ही केलेली प्रगती दिसत नाही, असे त्या म्हणाल्या. आमच्या बंधूने केवळ मला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची झूल घातली असून त्यांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही. त्यांच्या सत्तेच्या काळात जिल्ह्यात एकही भरीव काम झाले नाही. कागदावर रस्ते दाखवून बगलबच्चांना मोठे करण्याचे काम त्यांनी केले. यामुळे विकास खुंटला. या विकासाला गती देण्याचे काम मी आणि डॉ. प्रीतम मुंडेंनी केले आहे. जिल्ह्यात मी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे असे सांगितले. बारामतीकरांचे आपल्या जिल्ह्यावर प्रेम असते तर विकास झाला नसता का, असा सवाल करून आईची माया दाईला येत नसते, असे त्या म्हणाल्या.
माझ्या भावाने राष्ट्रवादी उद्ध्वस्त केली- प्रीतम मुंडेयावेळी बोलताना खा.डॉ. प्रीतमताई मुंडे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी संपविले तर आमच्या भावाने अख्खी राष्ट्रवादी उद्ध्वस्त केली आहे. उरली सुरली राष्ट्रवादी आगामी काळात पंकजा मुंडे संपवून टाकतील, असे सांगितले. माझी पात्रता विचारणाऱ्या विरोधकांनी त्यांच्या काळात काय कामे केली याचा हिशोब द्यावा, असे सांगून केलेल्या विकासाचा पाढा त्यांनी वाचला. मुंडेसाहेबांच्या नावाची एवढीच अॅलर्जी आहे तर स्वत:च्या सर्वेसर्वाना बोलावून मुंडेसाहेबांचे विचार मीच चालवतो, असे कौतुक करून घेण्याची गरज का वाटली, असा सवाल त्यांनी केला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा विकास होत आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि जिल्ह्याच्या पारदर्शक विकासासाठी मला पुन्हा ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
मला ओटीत घ्या, ही निवडणूक माझ्या इज्जतीची - धनंजय मुंडेपरळी : ही माझ्या इज्जतीची निवडणूक आहे, मला ओटीत घ्या, तुम्ही माझ्या दोन्हीही बहिणींना भरभरून प्रेम दिल. माझ्यावरही एक वेळ प्रेम दाखवा, शहराचा विकास करून दाखवेल, अशी भावनिक साद राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळीकरांना घातली.परळीत राष्ट्रवादीच्या वतीने उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासाठी सभा झाली. रॅली काढून प्रचाराचा समारोप करताना ते बोलत होते. अण्णा गेल्यानंतर घरातला कर्ता पुरु ष मी आहे, त्यामुळे काहीही झालं तरी तुमचा मोठा भाऊ आहे हे विसरु नका, असं भावनिक आवाहन त्यांनी पंकजा मुंडेंना केलंय. या सभेत धनंजय मुंडेंनी पंकजांवर जोरदार टीका केली. बीड जिल्ह्याने माझ्या दोन्ही बहिणींना भरभरून दिलं. राज्यात आणि केंद्रात सत्ता दिली. पण माझ्या बहिणीला माझ्याशिवाय कोणीच दिसेना. पंकजाताई, तुम्हाला नेमका कशाचा गर्व आणि घमेंड आहे? सत्ता येते आणि जाते, आपले राजकीय वैर असले तरी मी तुमचा मोठा भाऊ आहे हे लक्षात ठेवा, असं म्हणत त्यांनी पंकजांवर प्रहार केला. पंकजा मुंडेंकडूनच जातीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय.मला विरोधी पक्ष नेते करताना पवार साहेबांनी माझी जात पाहिली नाही. तुम्ही जातीयवाद करू नका, असं आवाहन त्यांनी केलं. बॅनरवरील माझा फोटो टॉप 3 मध्ये आहे. हे वारसा हक्काने नाही तर कर्तृत्वाने मिळाले आहे, असे मुंडे म्हणाले.
सर्वसामान्य माणसाला संधी द्या- बजरंग सोनवणेमी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील आहे. पक्षाने मला संधी दिली. या संधीचे सोने करुन तुमच्या समस्या सोडविल्याशिवाय राहणार नाही. यासाठी मला निवडून देऊन दिल्लीत पाठवा. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची मला जाण आहे. या भागाचा विकास करण्यासाठी मतदारांचे सहकार्य आवश्यक आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मतदारांना आवाहन केले.