बीड : कमी उंचीच्या भिंतीचा आधार घेत उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून अट्टल दरोडेखोराने पलायन केले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत कारागृह प्रशासनाने दरवाजा व इतर ठिकाणच्या भिंतींची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले. याला १३ दिवसांचा कालावधी उलटला तरी बांधकाम विभागाचा एकही अधिकारी, कर्मचारी कारागृहाकडे फिरकला नाही, असे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे. तर सा.बां.विभागाने पाहणी केली असून अंदाजपत्रक तयार केल्याचे सांगितले. या दोघांच्या टोलवाटोलवीने कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न अद्यापही गंभीरच आहे.
१५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास ज्ञानोबा जाधव (रा.रूपचंद तांडा जि.लातूर) या दरोडेखोराने कारागृहातून पलायन केले होते. ज्ञानोबा हा कारागृहातील एका खिडकीच्या आधारे छोट्या भिंतीवर चढला. तेथून तो मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला. येथून तो उंच असलेल्या संरक्षक भिंतीवर चढला. त्याच्यासोबत दुसरा सहकारीही होता. ज्ञानोबाने उंच भिंतीवरून उडी मारली. यामध्ये त्याच्या पायास दुखापत झाल्याने त्याचा सहकारी घाबरून पुन्हा कारागृहात परतला. त्यानंतर ज्ञानोबाला शोधण्यात कारागृह प्रशासनाची धांदल उडाली होती. सुदैवाने तो उपचार घेताना जिल्हा रुग्णालयात सापडला. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, या घटनेने कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सर्वस्तरातून कारागृह प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांनी तात्काळ मुख्य प्रवेशद्वारावरील भिंत, भेटण्याच्या कक्षाजवळील भिंत व इतर ठिकाणच्या काही त्रुटींबद्दल सा.बां. विभागाला पत्र पाठवून अंदाजपत्रक तयार करून देण्यासंदर्भात कळविले. परंतु यावर अद्याप कसलीच कारवाई झालेली नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व कारागृह प्रशासन या गंभीर प्रश्नावर एकमेकांकडे बोट दाखवित असून टोलवाटोलवी करीत असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका कारागृहाच्या सुरक्षिततेला बसत आहे.यापूर्वीही आरोपींनी केले होते पलायनकाही वर्षांपूर्वी कारागृहाच्या भिंतीची दगड काढून तीन आरोपींनी पलायन केले होते. त्यानंतर तात्काळ मजबूत अशी संरक्षक भिंत उभारण्यात आली. आता पुन्हा एका आरोपीन पलायन केल्यानंतर कारागृहातील कमी उंचीच्या भिंतीबद्दल शंका उपस्थित करण्यात आली. भिंतीची उंची वाढविण्यासाठी प्रशासन मात्र अद्याप तरी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.त्रुटींबद्दल जाारूकता हवीकारागृहातील काही भिंतीची उंची कमी असल्याचे माहिती असतानाही प्रशासनाने यापूर्वीच का पत्र पाठविलेले नाही. तसेच इतर सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा का केला, यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारागृहातील प्रत्येक गोष्ट व सुरक्षिततेसाठी प्रशासनाने जागरूक राहण्याची गरज आहे. घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा घटना घडू नयेत, यासाठी पाऊले उचलण्याची मागणी होत आहे.