बीड : प्लास्टिक बंदीचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर शनिवारपासून जिल्ह्यात प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला. मात्र बीडशिवाय अन्य कोणत्याही ठिंकाणी एकही कारवाई झाली नाही. तीन दिवसात बीड शहरात प्लास्टिकचा वापर तसेच साठा केल्याप्रकरणी १८ जणांवर नगर पालिकेच्या पथकांनी कारवाई करत दंड आकारला. सोमवारी पाच हजार रुपये दंडाची पहिली पावती फाटली तर एकूण १०५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
शनिवारी पहिल्या दिवशी शहरात १५ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यातील १४ जणांना प्रत्येकी ५० रुपये दंड आकारण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी रविवारी एक मिठाई दुकान व एक प्लास्टिक साहित्य विक्रेत्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर ५० किलो प्लास्टिक कॅरी बॅग, प्लास्टिक ग्लास, थर्माकोल प्लेट आदी जप्त करण्यात आले. तपासणी व कारवाई मोहिमेत अभियंता मंगेश भंडारी, विश्वंभर तिडके, सुनील काळकुटे, अमोल शिंंदे, भागवत जाधव, मुन्ना गायकवाड, पवन लाहोट, लखन प्रधान, महादेव गायकवाड आदींचा समावेश होता.
सोमवारी नगर पालिकेच्या पथकांनी २१ दुकानांची तपासणी केली. शहरातील जुना मोंढा भागात एका किराणा दुकानातून ५५ किलो प्लास्टिक जप्त केले. या विक्रेत्याला पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला. केज नगर पंचायतसह इतर नगर पंचायत व नगर पालिकांनी प्लास्टिक बंदी आदेशाच्या अंमलबजावणीला खो दिल्यामुळे बंदीचा फज्जा झाल्याचे पहायला मिळाले.
फळे, भाज्या, किराणा, स्टेशनरी इ. साहित्य विविध दुकानातून खरेदीनंतर ग्राहकांना प्लास्टिक पिशवी, कॅरीबॅगमधून साहित्य दिले जात होते. परळीतील बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे दिसून आले. बंदीचा निर्णय होण्याच्या आधीपासून काही औषधी दुकानांवर मात्र कापडी पिशव्या वापरल्या जात असल्याचे विक्रेते अभिजीत तांदळे यांनी सांगितले.झिल्ली नहीं साब !बाजारात किरकोळ खरेदी करणारे ग्राहक भाजी व फळविक्रेत्यांकडे कॅरी बॅगची मागणी करतात. या ग्राहकांना ‘झिल्ली नहीं साब’, असे उत्तर मिळत आहे. तर काही विक्रेत्यांनी प्लास्टिकला पर्याय असलेल्या कॅरी बॅगचा वापर सुरु केला. काही ग्राहक मात्र स्वत:च कापडी पिशवी घेऊन बाजारहाट करीत आहेत.