बीड : मागील वर्षी उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल बीड जिल्हा पोलीस दलातील चार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पोलीस महासंचालक पदकासाठी निवड झाली आहे. पोलीस निरीक्षक राजीव तळेकर, पोलीस कर्मचारी शेख सलीम शेख हबीब, मीरा रेडेकर आणि मनोज वाघ यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळणार आहे.
वर्षभरात चोख कर्तव्य बजावून उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. राजीव तळेकर यांची नेमणूक सध्या बीडला असून त्यांनी क्लिष्ट आणि थरारक बहुचर्चित गुन्ह्यांची उकल करून न्यायालयात खटले दाखल केले. त्यांना आजपर्यंतच्या सेवेत १५७ बक्षिसे मिळाली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेतील पो.हे.कॉ. सलीम शेख यांनी १५ वर्षांच्या सेवेत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ३१७ बक्षिसे प्राप्त केली आहेत. बीडच्या शिवाजीनगर ठाण्यातील मीरा रेडेकर यांनाही १५ वर्षांच्या कारकिर्दीत २२६ बक्षिसे मिळाली आहेत. तर, स्थानिक गुन्हे शाखेतील मनोज वाघ यांनाही १५ वर्षांच्या सेवेत २८५ बक्षिसे मिळाली आहेत. या चारीही कर्तबगार अधिकारी, कर्मचारी यांच्या मागील वर्षातील कामगिरीचा आढावा घेऊन, त्यांच्या प्रशंसनीय सेवेबद्दल महासंचालक पदकासाठी निवड करण्यात आली. बोधचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे या सन्मानाचे स्वरूप असणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा, उपअधीक्षक सुनील लांजेवार व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदक मिळविणाऱ्या सर्वांचे स्वागत केले.