कोरोना लसीकरणात बीड राज्यात पाचव्या स्थानावर
बीड : कोरोना लसीकरणात बीड जिल्हा राज्यात पाचवा तर मराठवाड्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील पहिल्या पाचमध्ये हिंगाेली, परभणी आणि बीडचा समावेश आहे. हिंगोली अव्वल आहे तर परभणी चौथ्या स्थानावर आहे.
कोरोना लढ्यात आरोग्य विभागाने सर्वात पुढे होऊन काम केले. त्यामुळे प्राधान्याने त्यांना पहिल्यांदा लस देण्यात आली. राज्यातील २८३ केंद्रांवर शनिवारी ही मोहीम यशस्वी झाली. २८ हजार ३०० लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. पैकी १८ हजार १६२ लोकांना लस टोचण्यात आली. याची टक्केवारी ६४ एवढी आहे. हिंगोली जिल्ह्यात केवळ दोन केंद्रावर ही लस टोचण्यात आली. त्यांना दिलेले २०० चे उद्दिष्ट त्यांनी पूर्ण केले. त्यामुळे ते राज्यात अव्वल राहिले. त्यानंतर परभणीने ९३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. बीड जिल्ह्यात ५ केंद्रांवर ५०० पैकी ४५१ जणांना ही लस टोचण्यात आली. याची टक्केवारी ९० आहे. बीड जिल्हा मराठवाड्यात तिसऱ्या तर राज्यात पाचव्या क्रमांकावर राहिला.
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, नोडल ऑफिसर डॉ.संजय कदम, डॉ.बाबासाहेब ढाकणे आदींनी यासाठी परिश्रम घेऊन नियोजन करीत आहेत. त्यांना सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, पीएचएन, मेट्रन आदी पथके सहकार्य करीत असल्याचे दिसत आहे.
३४ जणांना किरकोळ लक्षणे
बीड जिल्ह्यात आतापर्यंत ३४ जणांना ताप, थंडी, अंगदुखी, डोकेदुखी अशी किरकोळ लक्षणे जाणवली आहे. त्या सर्वांची तात्काळ तपासणी करून उपचार करण्यात आले आहेत. सध्या ते आरोग्य विभागाच्या निगराणीखाली आहेत. ज्यांना रविवारी लक्षणे जाणवली होती, ते सोमवारी ठणठणीत होऊन कर्तव्यावर हजर झाले होते.
ॲपने नियोजन कोलमडले
लसीकरणाचे सर्व नियोजने कोवीन ॲपद्वारे केले जात आहे. लाभार्थ्यांची नोंद करणे, संदेश पाठविणे असे सर्व यातून काम चालते. परंतु शनिवारी सर्वत्रच याला अडचणी आल्या. त्यामुळे मोबाईलवर संपर्क करून लाभार्थ्यांना निरोप देण्यात आला. ॲपच्या अडचणीमुळेही लसीकरणाची टक्केवारी कमी झाली आहे.
राज्यात असे झाले लसीकरण
राज्यात हिंगोली जिल्ह्याने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. त्यानंतर धुळे ९७ टक्के, बुलढाणा ९६, परभणी ९३, बीड ९०, सोलापूर ९०, भंडारा ८८, अमरावती ८८, अकोला ७९, ठाणे ७६, जालना ७२, उस्मानाबाद ७१, गोंदिया ७१, सातारा ६८, नंदूरबार ६६, रायगड ६५, नागपूर ६५, औरंगाबाद ६५, पालघर ६४, जळगाव ६३, लातूर ६३, अहमदनगर ६३, यवतमाळ ६३, पुणे ५८, वर्धा ५७, नाशिक ५७, वाशिम ५६, चंद्रपूर ५५, सिंधुदुर्ग ५५, गडचिरोली ५४, कोल्हापूर ५४, रत्नागिरी ५४, नांदेड ५२, सांगली ५१, मुंबई सुबुरबन ४९, मुंबई ४७ यांचा क्रमांक लागतो.