Beed Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर सध्या बीड जिल्हा न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू आहे. मात्र तपासाबाबत काही प्रश्न उपस्थित करत मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांची भेट घेतली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी अजित पवारांना भेटीवेळी दिलेल्या पत्रातून केली आहे.
अजित पवारांसोबत झालेल्या भेटीविषयी माहिती देताना धनंजय देशमुख म्हणाले की, "संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि मकोका अंतर्गत ज्या आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत ते आरोपी बीड कारागृहात आहेत. या कारागृहात नुकतीच काय घटना घडली, हे आपण पाहिलं. या प्रकरणानंतर ज्या घटना झाल्यात त्यातील आरोपींना नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी हलवण्यात येत आहे. पण हत्या आणि मकोकाच्या गुन्ह्यातील आरोपींना बीड कारागृहात कशामुळे ठेवलं आहे? याबाबत आम्ही विचारणा केली असून त्याचं उत्तर आम्हाला मिळणं अपेक्षित आहे," अशी आशा देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
"आम्ही इतर ज्या मागण्या केल्या आहेत त्या गांभीर्याने घेवून त्यांची पूर्तता लवकरच होईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे," अशी माहितीही धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
अजित पवारांनी बीड दौऱ्यात केलं होतं सूचक वक्तव्य
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी हे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचं उघड झाल्याने पक्षाची प्रतिमा मलीन झाली. या पार्श्वभूमीवर बीडमधील मेळाव्यात बोलताना बुधवारी अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. "एखाद्याला पक्षात घेताना त्याचं रेकॉर्ड तपासून घ्या. मी बीडच्या दौऱ्यावर येण्याआधी इथल्या एसपींकडून आज माझ्या दौऱ्यात जे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, त्यांचं रेकॉर्ड मागवून घेतलं. आपण लोकांना काही गोष्टी सांगत असताना आपल्या अवतीभोवतीही चुकीच्या प्रवृत्तीचे लोक असता कामा नयेत. एखादी गोष्ट हलक्यात घेतली तर त्याची किंमत पक्षाला आणि त्या नेतृत्वालाही मोजावी लागते," असं अजित पवार म्हणाले होते.