बीडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीत वाद पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:09 AM2018-10-30T00:09:55+5:302018-10-30T00:13:32+5:30
‘अजित पवार यांनी बीडमध्ये येऊन दाखवावे, आज पुतळा जाळला, ते ज्यादिवशी येतील, त्यादिवशी त्यांच्यासह गाड्यांचा ताफा जाळू,’ असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड येथे सोमवारी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ‘अजित पवार यांनी बीडमध्ये येऊन दाखवावे, आज पुतळा जाळला, ते ज्यादिवशी येतील, त्यादिवशी त्यांच्यासह गाड्यांचा ताफा जाळू,’ असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड येथे सोमवारी दिला. अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना शिवसैनिकांनी आक्रमक होत येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी प्रतिक्रिया देताना खांडे बोलत होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाक रे यांनी अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच मंदिर निर्मितीसाठी अयोध्या दौऱ्याचे देखील आयोजन केले आहे, असे ते म्हणाले होते. याविषयी जालना येथील सभेत बोलताना अजित पवार यांनी ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलने केली. सोमवारी बीडमध्ये अजित पवार यांच्या पुतळ््याचे दहन करुन त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे, गणेश वरेकर, जयसिंह चुंगडे, हनुमान पिंगळे यांच्यासह इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुंडलिक खांडे यांच्या ह्या वक्तव्याचा आणि अजित पवार यांच्या विषयीच्या लिखाणांचा निषेध म्हणून बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दहन करण्यात आले.
परळीत शिवसैनिकांनी लावले पोस्टर
परळी शहरातील बाजार समिती चौकातील, बसस्थानक व मुख्य रस्त्यावरील शौचालयास माजी उपमुख्यमंत्र्यांचा फोटो लावत शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख वैजनाथ सोळंके, शहरप्रमुख राजेश विभुते, युवा सेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, रमेश चौंडे, अभिजित धाकपडे, वैजिनाथ माने, किशन बुंदेले, संतोष उदावंत, श्रीकृष्ण नागरगोजे, बबन ढेंबरे, गोविंद जंगले, अनिल भोकरे, बजरंग औटी, महेश छत्रभूज यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर जिल्ह्यात फिरू देणार नाही...!
बीड : अयोध्येतील राममंदिर बांधण्याच्या संदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सुरु असलेल्या वादाचे पडसाद बीड जिल्ह्यात उमटले आहेत. सोमवारी शिवसेनेच्या वतीने अजित पवार यांच्या पुतळ््याचे दहन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरे यांच्या पुतळ््याचे दहन करण्यात आले.
अजित पवार यांचा पुतळ््याचे दहन केल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिका-यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर म्हणाले, अजित पवार यांच्या ताफ्यातील गाड्या जाळण्याचे तर सोडून द्या, जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागला तर, तुम्हाला जिल्ह्यात फिरू दिले जाणार नाही.
यावेळी बबन गवते, भाऊसाहेब डावकर, दिलीप भोसले, अमर नाईकवाडे, बळीराम गवते, पंकज बाहेगव्हाणकर, रमेश चव्हाण, बाळासाहेब पोपळे, भैय्यासाहेब मोरे, रणजित बनसोडे, विशाल घाडगे, झुंजार धांडे, मोहन देवकते आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.