बीड: आईसोबत भीक मागत कफल्लक अवस्थेत फिरणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची संतापजनक व घृणास्पद घटना २१ फेब्रुवारी रात्री साडेनऊ वाजता शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलातील शौचालयात घडली. या घटनेनंतर पीडित मुलीला तातडीने उपचारकामी जिल्हा रुग्णालयात दाखल करुन पोलिसांनी चार तासांत अल्पवयीन आरोपीला पकडले.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तीन वर्षांची मुलगी आईसोबत बसस्थानक व परिसरात भीक मागते. पीडितेची आई अंध असून २१ फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता आई बेकरीसमोर बसलेली होती. यावेळी तीन वर्षांची चिमुरडी तिच्या अवतीभोवती खेळत होती. विधिसंघर्षग्रस्त १४ वर्षीय मुलाने तिला २० रुपयांची नोट दाखवून स्वत:जवळ बोलावले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मागील प्रवेशद्वारातून आत नेले. तेथे पडलेल्या एका गमछाने तिचे हात बांधले व त्यानंतर तिच्याशी कुकर्म केले. मुलीच्या ओरडण्याच्या आवाजाने फिरण्यासाठी आलेल्या काही तरुणांचे लक्ष गेले. त्यांनी तिकडे धाव घेताच अत्याचार करणाऱ्या मुलाने पोबारा केला. पीडित मुलगी रडत आईकडे गेली. यावेळी तिच्या वस्त्रावर रक्ताचे डाग होते , त्यामुळे तिच्यावर अत्याचार झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणांनी संशयित मुलाचा पाठलाग केला, परंतु तो हाती लागला नाही. नागरिकांनी पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर बीड शहर पोलिस धावले. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, हवालदार कैलास ठोंबरे, मनोज वाघ, नसीर शेख, अशोक दुबाले, विकास वाघमारे, रामदास तांदळे, सतीश कातखडे यांनी संशयित विधिसंघर्षग्रस्त बालकाचा शोध घेतला.
माय-लेकराचा शोध घेऊन केले उपचारपीडित मुलगी रडत आईजवळ गेल्यावर तिने घडला प्रकार सांगितला. त्यावर आईने रागात तिला दोन चापटा मारल्या व पुन्हा प्रेमाने जवळ घेतले. त्यानंतर माय- लेकी बसस्थानकामागील स्वच्छतागृहाजवळ अंधारात विसावल्या. शहर ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक बाळासाहेब सिरसाट, हवालदार मनोज परजणे, आशपाक सय्यद, अविनाश सानप, सुशेन पवार यांनी त्या दोघींचा शोध घेतला. मुलीवर तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु केले.
पोलिसांनी कढली रात्र जागूनघटनेनंतर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक संतोष वाळके यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हे शाखेचे पो.नि.सतीश वाघ व बीड शहर ठाण्याचे पो.नि.रवी सानप यांनी आरोपीच्या मागावर पथके रवाना केली. रात्री दहा वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंंत अधिकारी शहर पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते.