लोकमत न्यूज नेटवर्कबीड : स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या शेकडो तरूण बुधवारी विविध मागण्यांसाठी बीडमध्ये रस्त्यावर उतरले. कोणाचेही नेतृत्व नसलेला आणि संतापाची लाट घेऊन विविध मागण्यांसाठी निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. अंगात सळसळते रक्त असले तरी हातुन कसलीही चुक न होऊ देता, शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा शांततेत पार पडला. विशेष म्हणजे यामध्ये मुलींचा सहभाग लक्षणीय होता.
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समिती, बीडच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. सकाळी नऊ वाजेपासूनच सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स परिसरात विद्यार्थी जमा होण्यास सुरूवात झाली. येथे मोर्चाचे नियोजन झाले. प्रत्येकाला नियमांचे पालन करून शिस्त पाळण्यासंदर्भात आवाहन केले. या मोर्चाचे नेतृत्व कोणीही करत नसून आपण सर्वच या नेतृत्व करणारे आहोत, असे सांगण्यात आले.
येथे अनेक विद्यार्थ्यांनी सरकारबद्दल आपला रोष व्यक्त केला. आपल्या मागण्यांबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यानंतर आकरा वाजता मोर्चाला सुरूवात झाली. अतिशय शिस्त आणि शांततेत मोर्चा निघाला. सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स स्टेडीअम कॉम्प्लेक्स, जालना रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. येथे शांततेचे आवाहन केल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. त्यानंतर राष्ट्रगिताने मोर्चाची सांगता झाली. यावेळी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी बीड शहर व शिवाजीनगर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.‘चमकोगिरी’साठी पदाधिका-यांची धडपडजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर काही राजकीय व विद्यार्थी संघटनांच्या पदाधिका-यांनी येथे हजेरी लावली. विद्यार्थ्यांच्या पुढे पुढे करीत ‘चमकोगिरी’ करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. एरव्ही झोपेत असलेल्या आणि राजकीय स्वार्थासाठी विद्यार्थ्यांचा वापर करणा-यांना या चमकोगिरी करणाºयांबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
या आहेत प्रमुख मागण्याराज्यसेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करावी
संयूक्त परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणे पीएसआय, एसटीआय, एएसओ ची स्वतंत्र परीक्षा घेऊन जास्तीत जास्त जागा भराव्यात ४पोलीस भरतीच्या पद संख्येत वाढ करावी
सर्व परीक्षेस प्रवेश बायोमेट्रीक पद्धतीने द्यावा ४राज्य व जिल्हा पातळीवर रिक्त जागा भराव्यात
एमपीएससीने परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवा, तामिळनाडू पॅटर्न वापरावा
राज्य शासनाने प्रत्येक पदासाठी प्रतिक्षा यादी जाहिर करावी
अभियोग्यता चाचणीनुसार शिक्षक भरती निवड प्रक्रिया तात्काळ करावी.
मुलींचा सहभाग लक्षणीयविद्यार्थ्यांच्या मोर्चात मुलींचा सहभाग लक्षणिय असल्याचे दिसून आले. सकाळपासूनच त्यांनी मुलांच्या बरोबरीने सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स परिसरात गर्दी केली होती. तसेच मुलांच्या बरोबरीने घोषणाबाजीही केली. निवेदन देण्यासाठी मुलांसोबत मुलींही आघाडीवर होत्या.
हातात फलक घेऊन घोषणाबाजीमोर्चात सहभागी विद्यार्थ्यांच्या हाती वेगवेगळ्या मागण्या असलेले फलक होते. तसेच हक्काच्या मागण्यांसाठी त्यांनी प्रशासन आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे शहर दणाणून गेले. मागील अनेक वर्षांत सुशिक्षित बेरोजगारांचा आणि कोणाचेही नेतृत्व नसलेला हा मोर्चा पहिल्यांदाच निघाला.