बीड: येथील जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मुंबईहून डॉ.प्रवीण मुंडे येत असल्याच्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या. परंतू दोघांनाही याबाबत लोकमतने विचारणा केली. त्यांनी असे काहीही नसल्याचे सांगत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. परंतू या पोस्ट कोणी व्हायरल केल्या आणि त्यामागचा उद्देश काय? याचा शोध पोलिसांनी घेणे आवश्यक आहे.
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूका सुरू आहेत. बीडमध्येही १३ मे रोजी मतदान झाले. जिल्ह्यात प्रचार आणि मतदान प्रक्रिया शांततेत झाली. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि त्यांच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त केला. परंतू १५ मे रोजी दुपारपासून त्यांच्या बदलीच्या अफवा सुरू झाल्या. काही लोकांनी मुंबईचे झोन २ चे उपायुक्त डॉ.प्रवीण मुंडे यांचा फोटो टाकत बीडचे नवे एसपी, अशा पोस्ट व्हायरल केल्या.
याची खात्री करण्यासाठी लोकमतने डॉ.मुंडे आणि ठाकूर या दोघांनाही संपर्क केला. यावर त्यांनी असे काहीही नसल्याचे सांगितले. दरम्यान, सध्या आचारसंहिता चालू आहे. या काळात बदल्या करणे शक्य नसते. तसेच जिल्ह्यात अधीक्षकांच्या दुर्लक्षामुळे काही अनुचित प्रकारही घडला नाही. त्यामुळे अशाप्रकारची अचानक बदली होऊ शकत नाही, अशी माहिती काही पोलिस विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर समजली.