- शिरीष शिंदेबीड - नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाचे काम अर्धवट आहे. असे असतानाही काही दिवसांपुर्वी या अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यात आले. त्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी गांधी जयंतीचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवारी प्रतिकात्मक रेल्वे आंदोलन केले. उर्वरीत काम तातडीने पुर्ण करण्यात यावे अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
१९९५ साली नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला तत्वतः मंजुरी मिळाली. अहमदनगर-परळी रेल्वे मार्गाची एकुण लांबी २६१ किलोमीटर असून अहमदनगर पासून आष्टी पर्यंत केवळ ६७ किलोमीटर अंतराचे रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. राजकीय इच्छाशक्ति अभावी रेल्वे मार्गाचे काम रखडल्यामुळे ३५४ कोटीं रुपयांचा प्रकल्प ४८०० कोटींच्या आसपास पोहचला आहे. मागील २२ वर्षांत केवळ ६७ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून २०२४ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रेल्वे मार्गाच्या या अर्धवट कामाचे काही दिवसांपूर्वी उद्घाटन करून शासन व लोकप्रतिनिधींकडून जनतेची दिशाभूल होत आहे असून उर्वरीत काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनात महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डाॅ. गणेश ढवळे, सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड, राष्ट्रवादीचे नेते नीळकंठ वडमारे, अशोक हांगे, शेख युनुस, राहुल कवठेकर, सय्यद आबेद ,शेख मुबीन, किस्किंदा पांचाळ, शेख मुस्ताक, अशोक येडे, संतोष ढाकणे आदी सहभागी झाले होते. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्यामार्फत पंतप्रधान, रेल्वे मंत्री यांना देण्यात आले. आंदोलकांचे केले स्वागत रेल्वेसाठी सातत्याने आंदोलन करणारे आंदोलकांचे स्वागत यावेळी करण्यात आले. स्वातंत्र्य सैनिक रेल्वे समितीचे पदाधिकारी नामदेव क्षीरसागर, आ.सुनिल धांडे, सत्यनारायण लाहोटी, मंगेश लोळगे तसेच विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीचे अशोक हांगे, संगमेश्वर आंधळकर, प्रा. पंडित तुपे, सी.ए. जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.