- मधुकर सिरसट लोकमत न्यूज नेटवर्क केज (जि. बीड) : जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते, हे केज येथे टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चहावाल्याच्या बायकोने सिद्ध करून दाखवून दिले. मुंबई पोलिस दलात तिची शिपाई आणि चालक या दोन्ही पदावर निवड झाली.
केज येथील पोलिस ठाण्यासमोर महामार्गालगत बालाजी पाचपिंडे यांची चहाची टपरी आहे. ते लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथील मूळ रहिवासी. उपजीविकेच्या शोधात त्यांनी तीन वर्षांपूर्वी एक लहानशी चहाची टपरी सुरू केली. यातून त्यांना दिवसाकाठी ६०० ते एक हजार रुपये मिळतात, त्यातूनच त्यांना कुटुंबाचा खर्च भागवावा लागतो. राहायला स्वतःचे घर देखील नाही. बालाजी यांची पत्नी माधवी पाचपिंडे-वाघचौरे हिने विद्यार्थ्यांची शिकवणी घेऊन कुटुंबाला हातभार लावला. तिने पोलिस भरतीची तयारी सुरू ठेवली. लेखी परीक्षेसाठी इंग्रजी, गणित व सामान्य ज्ञान या विषयांचाही अभ्यास केला. इतकेच नाहीतर वाहन चालविण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले.
पोलिस ठाण्यात सत्कार बालाजी पाचपिंडे आणि मुंबई पोलिसांत पोलिस शिपाई आणि चालक म्हणून निवड झालेली त्यांची पत्नी माधवी या दोघांचा केज पोलिस ठाण्यात निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सत्कार केला.
लवकरच हाेणार रुजू माधवी लवकरच प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहे. पती बालाजी पाचपिंडे यांनी दिलेले प्रोत्साहन आणि मोठी नणंद जमादार रुक्मिणी पाचपिंडे यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश सोपे झाल्याचे माधवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.