बीड - नर्सिंग प्रवेशाची सीईटी परीक्षा २८ मे २०२४ रोजी होती. या परिक्षसाठी शासकीय तंत्रनिकेतन येथे नियोजित केंद्र होते. मात्र इव्हीएम मशीन स्ट्राँग रूममुळे परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलण्यात आल्याचा मेसेज सबंधित या केंद्रावरील हॉलतिकीट दिलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आला नाही. ६० पेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी या ठिकाणी परीक्षेच्या आधी पोहोचल्यानंतर परीक्षा घेणाऱ्या कंपनीला चूक लक्षात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला अन् परीक्षा घेणाऱ्या या कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
ऐनवेळी परीक्षा केंद्र अंबाजोगाई निवडल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. एका तासात बीडवरून अंबाजोगाई पर्यंत विद्यार्थी कसे पोहोचणार? या गोंधळात विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांच्या पालकांनी याबाबत सामाजिक कार्यकर्ते धनंजय गुंदेकर यांना मदत मागितली. गुंदेकर यांनी तत्काळ पोहोचत संबंधित प्राचार्यांशी संपर्क केला. अंबाजोगाई खूप दूर पडते आहे. जर परीक्षा घेतली गेली नाही तर ६० विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार होते.या प्रकाराने पालक अन् विद्यार्थिनींच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेले होते. अखेर सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना चऱ्हाटा फाटा येथील स्वामी विवेकानंद कॉम्पयुटर इन्स्टिट्यूट येथे नेले.तेथे दुपारी एक वाजता १४ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची सोय झाली. त्यानंतर ३ वाजता सर्व उर्वरित विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास परवानगी मिळाली.