बीड/परळी : स्वस्त सोन्याच्या आमिषाने येथील एका सराफ व्यापाऱ्यास ४० लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती. दरम्यान, शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून दोन भामट्यांना पाकिस्तानच्या सीमेजवळील गुजरातच्या कच्छ परिसरातून अटक केली. मतिमंद असल्याचा बहाणा करून तसेच वेश बदलून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.
शंकर शहाणे असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांना जीसूप मोहम्मद अली कक्कळ आणि सिकंदर या दोघांनी स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविले. सुरुवातीला पाच लाख देऊन त्यांनी स्वस्तात सोने खरेदी केले. शहाणे यांचा विश्वास संपादन करुन त्या दोघांनी त्यांच्याकडून ४० लाख रुपये घेतले व सोने देण्यास टाळाटाळ केली नंतर कोरोनाचे कारण देत पैसे व सोने देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शहाणे यांनी शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
दरम्यान, जीसूप कक्कळ याने आपले नाव बदलून अब्बास आली अशा नावाचा वापर केल्याचे समोर आले. आरोपींच्या शोधात शहर ठाण्याचे पथक मुंबई, नागपूर, अमरावती, बुलडाणा, भोकरदन, सोलापूर या भागात शोध घेतला. शहर ठाण्याचे सहायक निरीक्षक भार्गव सपकाळ, गुप्त शाखेचे अंमलदार भास्कर केंद्रे, गोविंद भताने, श्रीकांत राठोड यांनी आरोपींच्या शोधार्थ मुंबई गाठली. एका खबऱ्याकडून हा आरोपी त्याचे मूळ नाव जीसूप कक्कळ असून तो पाकिस्तान सीमेवरील भूज कच्छ भागातील जंगलात राहतो, अशी माहिती मिळाली. रतिया येथील फार्महाऊसवर तपास पथक स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोहोचले.
रतिया पासून पाकिस्तानची सीमा केवळ ७० किलोमीटर अंतरावर आहे. भास्कर केंद्रे यांनी मतिमंद व्यक्तीचा वेश धारण केला. दरवाजा वाजविल्यानंतर आरोपींनी मागील बाजूने जंगलात पलायनाचा प्रयत्न केला. यावेळी सपोनि भार्गव सपकाळ व भास्कर केंद्रे यांनी पिस्तूल दाखवून दोघांच्याही मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ४० लाख हस्तगत केले. पोलीस कोठडी संपल्यावर १३ एप्रिलला त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात झाली.
आठशेवर सीडीआर तपासल्यावर आरोपी गळाला
आरोपी जिसूप कक्कळ आणि सिकंदर यांचा छडा लावण्यासाठी परळी शहर पोलिसांनी आठशेेपेक्षा अधिक जणांचे मोबाइलचे कॉल डिटेल्स तपासले. यात
सहायक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी पूर्वी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये काम केले होते, तो अनुभव कामी आला.