बीड : पान खाण्यासाठी टपरीजवळ बाहेर आलेल्या कारचालकास चाकूचा धाक दाखवून ३० हजार रूपयांना लुटल्याची घटना सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास बीड श्हारातील नगर नाक्यावर घडली होती. पोलिसांनी अवघ्या १० तासांत दोन्ही लुटारू गजाआड केले. ही कारवाई दरोडा प्रतिबंधक पथकाने केली.
दिलीप बाजीराव सुरासे (रा.खोकडपुरा, औरंगाबाद) असे कार चालकाचे नाव आहे. सोमवारी ते कार्यक्रमासाठी पत्नीसह कारमधून (क्र.एम.एच.२० बीक्यू ८८००) बीडमध्ये आले होते. रात्री त्यांनी पत्नीला अंबिका चौकात नातेवाईकांच्या घरी सोडले. त्यानंतर सुरासे हे पान खाण्यासाठी बाहेर पडले. कार घेवून ते नगरनाका येथील पानटपरीजवळ आले. मात्र सर्व पानटपऱ्या बंद झाल्याने सुरासे हे तिथेच कारमध्ये मोबाईलवर बोलत बसले होते. याचवेळी दोन चोरट्यांनी त्यांना लुटले. रोख १० हजार रूपये आणि दोन मोबाईल असा ३० हजार रूपंयाचा ऐवज घेऊन ते फरार झाले. त्यानंतर सुरासे यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.
घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला होता. त्यांनी तात्काळ चक्रे गतीने फिरविली. यामध्ये विकी राजू कांबळे (२५ रा.राजुरीवेस, बीड) व सुयोग मच्छिंद्र प्रधान (१८ रा.साईपॅलेसच्या पाठिमागे, बीड) दोघे असल्याचे समजले. विकीला बार्शी रोडवर तर सुयोगला जालना रोडवर ताब्यात घेतले. या दोघांनाही शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन जाधव, मुंजाबा सौंदरमल, श्रींमत उबाळे, अंकुश दुधाळ, अशोक दुबाले, राहुल शिंदे, महेश चव्हाण, माया साबळे, नारायण कोरडे, भरत कोळेकर, अविनाश गवळी आदींनी केली.