बीड : कोरोना लसीकरण करण्यात सुरुवातीच्या आठवड्यात बीड जिल्हा राज्यात अव्वल होता. परंतु नंतर लाभार्थी लसीकरणाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे जिल्ह्याची घसरण झाली असून सध्या बीड राज्यात २६ व्या क्रमांकावर आहे. कोमॉर्बिड आजार असलेले लाभार्थी अद्यापही लसीकरणापासून लांबच असल्याचे दिसत आहे. हा टक्का वाढविण्यासाठी आवाहन केले जात असतानाही अनुत्साह असल्याचे दिसते.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ पाच केंद्र होते. नंतर ते वाढवून ९ केले. सुरुवातीला केवळ हेल्थ केअर वर्करला कोरोना लस टोचण्यात येत होती. परंतु आता फ्रंट लाइन वर्करलाही ही लस दिली जात आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात १ असे ११ केंद्र तयार केले आहेत. असे असले तरी सुरुवातीला जो उत्साह लसीकरणाला दिसला तो सध्या दिसत नाही. पहिल्या आठवड्यात उद्दिष्टापेक्षा जास्त लसीकरण होत असल्याने बीड जिल्हा राज्यात अव्वल होता. परंतु सद्यस्थितीत यात मोठी घसरण झाली असून बुधवारपर्यंत २६ व्या स्थानी होता. हा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे.
गैरसमजामुळे लाभार्थी दूरच
लस घेतल्यानंतर ताप, थंडी, डोकेदुखी असे किरकोळ लक्षणे जाणवू शकतात. परंतु त्यापेक्षा गंभीर लक्षणे अद्यापतरी बीडमध्ये कोणाला आढळलेली नाहीत. परंतु साेशल मीडियावरील विविध मेसेज, व्हिडिओंमुळे लाभार्थी पुढे येत नाहीत. तसेच कोमॉर्बिड आजार असलेले तर यापासून दूर पळत आहेत. विशेष म्हणजे यात हेल्थ केअर वर्करचाही समावेश आहे. केवळ गैरसमज असल्यामुळे लाभार्थी पुढे येत नसल्याचे सांगण्यात आले.
हेल्थ केअर वर्करचे ४३, तर फ्रंटलाइन वर्करचे २१ टक्के लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ हेल्थ केअर वर्करचे ४३ टक्के तर फ्रंटलाइन वर्करचे केवळ २१ टक्के लसीकरण झाले आहे. राज्यात हेल्थ केअर वर्करचे भंडारा जिल्ह्याचे सर्वाधिक ७१ टक्के लसीकरण झाले आहे. तर फ्रंटलाइन वर्करचे सर्वाधिक ४३ टक्के उस्मानाबाद जिल्ह्याचे लसीकरण झाले आहे.
तर फ्रंटलाइन वर्करकडून अद्यापही अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळालेला नाही. हेल्थ केअर वर्करने सुरुवातीला चांगला प्रतिसाद दिला. सर्व लाभार्थ्यांना संपर्क करण्यासाठी स्वतंत्र पथक नियूक्त केलेले आहे. शिवाय संदेशही पाठविला जातो. परंतु ते येत नाहीत. हा टक्का वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत.
डॉ. संजय कदम, नोडल ऑफिसर, बीड