लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पोलीस भरतीची मैदानी चाचणी पार पडल्यानंतर आता ३० मार्च रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी तगडा बंदोबस्त राहणार असून, परीक्षावर कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. तसेच दलालांवर वॉच ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्ती केली आहेत. एखाद्या व्यक्तीवर संशय वाटल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे.
१२ ते २१ मार्च दरम्यान पोलीस मुख्यालयावर ५३ जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया पार पडली. तब्बल चार हजारांवर उमेदवारांनी ही चाचणी दिली. पात्र - अपात्र उमदेवारांची माहिती काढणे अद्यापही सुरुच आहे. दरम्यान, पोलीस दलाने लेखी परीक्षेची तारीख ३० मार्च जाहीर केली आहे. सकाळी ७ वाजता बीड शहरातील तेलगाव नाक्यावरील आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयात ही परीक्षा घेतली जाणार आहे.
परीक्षेला येताना पोलीस भरतीचे ओळखपत्र, चेस्ट नंबर, स्वत:चा फोटो असलेले ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असल्याचेही जी. श्रीधर यांनी सांगितले. या परीक्षेत गडबड गोंधळ होणार नाही त्या दृष्टिकोनातून तगडा बंदोबस्त लावला आहे. तसेच प्रत्येक हॉलमध्ये सीसीटीव्ही व व्हिडीओ कॅमेरे राहणार असल्याचेही श्रीधर यांनी सांगितले.अफवांवर विश्वास नकोलेखी परीक्षेत पैसे देऊन भरती होता येते अशी अफवा शहरात पसरली आहे. परंतु पोलीस दलाने असा कुठलाही प्रकार होणार नाही असा विश्वास उमेदवारांना दिला आहे. असे कोठे होते असेल तर गोपनीय माहिती द्यावी, त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. परीक्षा पारदर्शकपणे होणार आहे. उमेदवार व नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असे आवाहनही जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे, अजित बोºहाडे, उप अधीक्षक सुधीर खिरडकर यांनी केले आहे.