बीड : जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या तब्बल एक हजार कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याचे अद्यापही वेतन झाले नसल्याचे समोर आले आहे. आगोदरच एनएचएम विभागातील ढिसाळ कारभारामुळे उशिराने अहवाल तयार झाला. तर आता दोन दिवसांपासून सर्व फाईल तयार असतानाही केवळ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांची स्वाक्षरी नसल्याने हे पगार थांबले आहेत. पवार हे दोन दिवसांपासून दाैऱ्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शिपाई ते डॉक्टर, अधिकारी असे जवळपास एक हजार लोकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली. या सर्वांचे वेतन करण्याची जबाबदारीही एनएचएम विभागावरच आहे. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला शक्यतो वेतन देणे आवश्यक आहे. काही तांत्रिक अडचणी असतील तर ५ तारखेच्या आत करणे बंधनकारक आहे. परंतु बीड याला अपवाद आहे. नोव्हेंबर महिन्याचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. एनएचएम विभागाला विचारणा केल्यावर येथील अधिकारी सीईओंची स्वाक्षरी नसल्याचे कारण सांगत आहेत. परंतू यात सामान्य कर्मचारी भरडले जात आहेत. सीईओंचे दौरे आणि एनएचएम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आज एक हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर काम करूनही पगारासाठी प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्याशी संपर्क केला, परंतू नेहमीप्रमाणे त्यांनी फोन घेतला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.
आज स्वाक्षरी होईल सर्व फाईल तयार आहे. सीईओंची स्वाक्षरी नसल्याने वेतन झालेले नाही. आज स्वाक्षरी होईल.- डॉ. अमृता मुळे, जिल्हा व्यवस्थापक, एनएचएम