लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेच्या पाच वर्षांपुर्वीच्या लेखाशीर्ष आणि वार्षिक अहवाल तपासणीसाठी पंचायत राज समिती मंगळवारी बीडमध्ये दाखल झाली असून तीन दिवस या समितीच्या सरबराईसाठी जि. प. ची यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण ७० आक्षेपांवर ही समिती तपासणी करणार असून त्या काळातील अधिका-यांनाही उत्तरे देण्यासाठी पाचारण केल्याची माहिती मिळाली आहे.
२०१२-१३ मधील आक्षेप अनुपालन आणि वसुलीची कार्यवाही किती व कशी झाली याबाबत सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखालील समिती तपासणी करणार आहे. या कालवधीत जवळपास ७० आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्या आक्षेपांची उत्तरे जि. प. अदिकाºयांना द्यावी लागणार आहेत. यात सर्व शिक्षा विभागांतर्गत केलेली खोलीकामे, इतर शैक्षणिक योनांवरील खर्च, बांधकाम विभागांतर्गत केलेली कामे, पाणीपुरवठा, कृषी व पशुसंवर्धन विभागातील कामे, पंचायत समिती स्तरावरील राबविलेल्या योजना तसेच सामान्य प्रशासन विभागातील कामकाज याबरोबरच आर्थिक अनियमितता आदी विषयांवर पीआरसी चौकशी करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
निवासासाठी शासकीय विश्रामगृह, हॉटेल, लॉजिंगच्या रूम आरक्षित केल्या असून २० पैकी बहुतांश संपर्क अधिकारी मंगळवारी रात्रीच बीड येथे पोहोचले आहेत. यासाठी २८ स्थानिक संपर्क अधिकारी समिती सदस्यांच्या दिमतीला असणार आहेत.
१० जानेवारी रोजी स्काऊट भवन येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत त्यानंतर जि. प. पदाधिका-यांशी चर्चा, आक्षेपांवरील तपासणी, सीईओंची साक्ष, दुस-या दिवशीचा दौरा नियोजन, ११ जानेवारी रोजी पंचायत समिती स्तरावरील कामांची पाहणी व योजना राबविलेल्या कामांच्या अनुषंगाने निदर्शनास आलेल्या त्रुटींबाबत गटविकास अधिका-यांची साक्ष तसेच २३-१४ वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात साक्ष १२ जानेवारी रोजी होईल.
पीआरसी समितीसह सचिवालयाचे उपसचिव, अवर सचिव, २ कक्ष अधिकारी, समिती प्रमुखांचे स्वीय सहायक, ५ कर्मचारी, ४ प्रतिवेदक असे मंत्रालयातील १३ अधिकारी येणार आहेत. यातील वरिष्ठ अधिका-यांसाठी व्हीआयपी कक्षाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.स्काऊट भवनमध्ये पीआरसीसध्या जिल्हा परिषदेच्या नुतन इमारतीचे काम सुरु असल्याने सर्व विभाग वेगवेगळ्या इमारतींमध्ये आहेत. तसेच बैठक घेण्यासाठी प्रशस्त जागा नसल्याने बसस्थानकासमोरील भारत स्काऊट गाईडच्या इमारतीमध्ये ही बैठक होणार आहे. तेथे राउंड टेबल असेल.अध्यक्ष व सदस्यांसमोर मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखा व वित्त अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतील आक्षेपांशी संबंधित फाईलींवर केलेल्या कार्यवाहीबाबत हे अधिकारी समितीला उत्तरे देतील. फाईलींशिवाय विचारणा झाल्यास त्या कालावधीत बीड येथे कार्यरत असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांनाही बोलावण्यात आल्याचे समजते.