बीड : तब्बल १५२ वर्षांनंतर दिसणाºया चंद्रग्रहणाचा बुधवारी बीडमधील खगोलप्रेमींनी आनंद लुटत ‘सुपर ब्लड रेड मून’ पाहिला. येथील स्वा. सावरकर महाविद्यालय परिसरात ४ इंची खगोलीय दुर्बिणीतून मून पाहण्याची व्यवस्था केली होती. सायंकाळी साडेपाच वाजेपासून महाविद्यालयाचा परिसर विद्यार्थी, पालक, शिक्षक व हौशी खगोलप्रेमींच्या गर्दीने फुलला होता.
खगोलप्रेमींनी चंद्रग्रहणाआधीची प्रारंभस्थिती, ग्रहण लागल्यानंतरची मध्य व ग्रहण सुटताना मोक्षस्थिती उत्साहाने अनुभवली. चंद्रावरील खड्डे, विविध अवस्था, ग्रहणातून बाहेर पडतानाचा प्रकाशित भाग पाहून ते खुश झाले. भुगोल विभागाचे प्रा. जोगेंद्र गायकवाड यांनी दुर्बिणची सेटिंग सांभाळत विद्यार्थ्यांना माहिती दिली. उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, भूगाल विभागप्रमुख डॉ. अशोक डोके, प्रा. सुहास जोशी, पुरुषोत्तम मालपाणी, शामसुंदर घाडगे, सावरकर विद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते.