बीड : सर्वधर्मसमभाव ठेवून जातीय सलोखा वाढविण्यासाठी हजारो बीडकर रविवारी पहाटे धावणार आहेत. बीड पोलिसांच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थी, महिला, पुरुषांचा मोठा सहभाग असणार आहे. या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षीही अशीच स्पर्धा घेतली होती. तिला बीडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. हाच धागा पकडून यावर्षीही स्पर्धा घेण्याचे नियोजन झाले. मागील १५ दिवसांपासून याची तयारी सुरू होती. ही तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
रविवारी सकाळी सहा वाजताच ही स्पर्धा सुरू होणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे, तर विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी रोटरी क्लब आॅफ बीड मिडटाऊन, परिजात कन्सल्टन्सी, गणराज मोबाईल, तिरुमला आॅईल इंडस्ट्रीज, त्रिमूर्ती सेल्स कॉर्पोरेशन, बीडची व्यापारी संघटना, निखिल नेटवर्क अँड वाय-फाय यांचे सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेत सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारीही सहभागी होणार असल्याचे समजते.
बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, प्रा. प्रशांत जोशी यांच्यासह सर्व पोलीस निरीक्षक स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग पोलीस मुख्यालयापासून स्पर्धेला सुरुवात होईल. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बलभीम चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मन्सूरशहा दर्गा चौक, मोंढा रोडमार्गे जिल्हा क्रीडा संकुलावर समारोप होईल. स्पर्धकांना अडथळा येणार नाही, यासाठी वाहतूक पोलिसांसह सर्व ठाण्यांचे पोलीस अधिकारी, कर्मचारी सज्ज राहतील. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला टी-शर्टही दिले जाणार आहेत.
संपूर्ण तयारी झाली आहे ‘रन फॉर नेशन युनिटी’ या उपक्रमासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा असेल. स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली आहे. जास्तीत जास्त सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी करावा.- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक